अध्यक्षांचा राजीनामा मंजूर, आता मोर्चेबांधणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:18 AM2021-06-25T04:18:34+5:302021-06-25T04:18:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांचा राजीनामा एक दिवसात मंजूर ...

President's resignation approved, now the formation of the front begins | अध्यक्षांचा राजीनामा मंजूर, आता मोर्चेबांधणी सुरू

अध्यक्षांचा राजीनामा मंजूर, आता मोर्चेबांधणी सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांचा राजीनामा एक दिवसात मंजूर झाला असून, शुक्रवारीच निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. ठरल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी राजीनामे झाल्याने उर्वरित कालावधीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

बजरंग पाटील यांचा राजीनामा सकाळी साडेदहा वाजता प्रतिनियुक्त केलेल्या व्यक्तीकडून विभागीय आयुक्त सौरव राव यांच्यासमोर होता. त्यांनी सही केल्यानंतर एकीकडे तो मंजूर केल्याचा मेल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला तर दुसरीकडे संध्याकाळी प्रत्यक्ष याबाबतचे पत्र कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. उपाध्यक्षांसह चारही सभापतींचे राजीनामे आणि त्यानंतरची पत्रे घेऊन सकाळी दहा वाजता सामान्य प्रशासनचे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होते. त्यामुळे शुक्रवारी निवडीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

राजीनामे झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांबाबत दोन मतप्रवाह आहेत. सर्वाधिक सदस्य असल्याने पालकमंत्री सतेज पाटील हे अध्यक्षपद सोडणार नाहीत, असे मानले जाते. त्यामुळे सरिता शशिकांत खोत यांचे नाव या पदासाठी आघाडीवर आहे. परंतु, ग्रामविकास मंत्री असताना माझ्या तालुक्याला अध्यक्षपद मिळावे, अशी आग्रही मागणी हसन मुश्रीफ यांनी केली तर मग युवराज पाटील यांचे नाव अंतिम मानले जाते. मात्र, अध्यक्षपद काॅंग्रेसकडे गेल्यास जयवंतराव शिंपी, मनोज फराकटे, विजय बोरगे ही नावे उपाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. कदाचित राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद गेल्यास पांडुरंग भांदिगरे यांचे नाव उपाध्यक्ष पदासाठी पुढे येऊ शकते.

याआधीची तीन सभापतीपदे ही हातकणंगले लोकसभा मतदार संघातील तीन माजी आमदारांच्या समर्थकांना मिळाली होती. याच धर्तीवर आता कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील तिघा नेत्यांच्या कार्यकर्त्यांना ही पदे दिली जातील. यामध्ये महिला आणि बालकल्याण समितीसाठी खासदार संजय मंडलिक यांच्या समर्थक शिवानी भोसले तर समाजकल्याण समिती सभापती पदासाठी चंद्रदीप नरके यांच्या समर्थक कोमल मिसाळ यांचे नाव निश्चित मानले जाते.

बांधकाम विभागासाठी आमदार प्रकाश आबिटकर समर्थक वंदना जाधव आणि अपक्ष सदस्य रसिका अमर पाटील यांच्यात रस्सीखेच आहे. दोघींपैकी एका सदस्याला शिक्षण समिती देण्यात येईल.

चौकट

राहुल पाटील यांच्या नावाची चर्चा

आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्याही नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू आहे. राज्यस्तरीय नेत्यांकडून या नावाचा आग्रह झाला तर मग पालकमंत्री सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ‘गोकुळ’ निवडणुकीनंतर काॅंग्रेस कमिटीमध्ये मंत्री पाटील यांनी पी. एन. आणि आपण एकत्रच असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे या चर्चेत काही तथ्य आहे का, हे जुलैच्या पहिल्या आठवड्यातच कळणार आहे.

चौकट

येणाऱ्या विधानपरिषदेचा संदर्भ

मंत्री सतेज पाटील यांच्यासाठी येणारी विधान परिषद निवडणूक महत्त्वाची आहे. याचाही विचार या निवडींमागे राहणार आहे. त्यामुळे काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांच्या योग्य समन्वयातूनच या निवडी करण्यासाठी सतेज पाटील प्रयत्नशील आहेत.

चौकट

पाटील, मुश्रीफ यांची वेगवान यंत्रणा

शिवसेनेच्या तीनही पदाधिकाऱ्यांसह पाचजणांचे राजीनामे झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. बजरंग पाटील यांना वयोमानामुळे पाठवण्याऐवजी प्रतिनियुक्तीचा माणूस पहाटेच पुण्याला पाठविण्यात आला. त्यांच्यासोबत एक अधिकारीही होते. एका दिवसात प्रक्रिया होऊन राजीनामा मंजूर होऊन तसा मेल आणि प्रत्यक्ष पत्रही कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात पोहाेच करण्यात आले.

Web Title: President's resignation approved, now the formation of the front begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.