‘गोकुळ’साठीही आता ‘बटण दाबा’
By admin | Published: October 26, 2014 12:05 AM2014-10-26T00:05:21+5:302014-10-26T00:05:40+5:30
चाचपणी सुरू : निवडणुकीत ‘ईव्हीएम’चा वापर शक्य
प्रवीण देसाई \कोल्हापूर
वेळ आणि अचूकता येऊन निवडणूक प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत यंदा ‘ईव्हीएम’ मशीनचा वापर करण्याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या संचालकांना ‘गोकुळ’मध्ये पाठविण्यासाठी मतपत्रिकेवर शिक्का माराव्या लागणाऱ्या मतदाराला आता लोकसभा, विधानसभेप्रमाणे ‘ईव्हीएम’चे बटण दाबावे लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आता लोकांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघा (गोकुळ)च्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. ठराव, पॅनल यादृष्टीने काही प्रमाणात तयारी सुरू आहे. संचालक व समर्थक मतदार यांच्याकडून ही तयारी सुुरू असताना राज्य सहकार निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीत ‘ईव्हीएम’ मशीनच्या वापराबाबत चाचपणी सुरू केली आहे. मतपत्रिका (बॅलेट पेपर)मुळे मते बाद होण्याचे मोठे प्रमाण, मतमोजणीसाठी लागणारा प्रचंड वेळ आणि यासाठी लागणारे मनुष्यबळ यांमुळे मतदान व मतमोजणी प्रक्रिया लांबते हे सर्वश्रुत आहे. त्या दृष्टीने पावले उचलत निवडणूक आयोगाने ‘ईव्हीएम’चा वापर सुरू केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत याचे चांगले निकाल मिळाले. कमी वेळात व पारदर्शीपणे या यंत्राद्वारे मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडली; परंतु या मशीनचा वापर सुरू होऊनही सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचा वापर झालेला नाही. येत्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये या मशीनचा वापर करून ही प्रक्रिया सुलभ करण्याचा विचार निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही किंवा तो कधी होणार हे निश्चित झालेले नाही. तरीही आयोगाने त्यादृष्टीने पावले उचलली असल्याचे समजते.