धमक्यांचे प्रेशर बंद करण्यासाठी ‘प्रेशर कुकर’ पुढील बटन दाबा, आमदार सतेज पाटील यांनी केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 15:18 IST2024-11-16T15:17:27+5:302024-11-16T15:18:59+5:30
कोल्हापूर : लोकसभेला ‘४०० पार’चा नारा देणाऱ्यांना मतदारांनी नाकारल्यानंतर बहिणीसह सर्वजण लाडके झाले. त्यातही यांचे नेते पदरचे देत असल्याप्रमाणे ...

धमक्यांचे प्रेशर बंद करण्यासाठी ‘प्रेशर कुकर’ पुढील बटन दाबा, आमदार सतेज पाटील यांनी केले आवाहन
कोल्हापूर : लोकसभेला ‘४०० पार’चा नारा देणाऱ्यांना मतदारांनी नाकारल्यानंतर बहिणीसह सर्वजण लाडके झाले. त्यातही यांचे नेते पदरचे देत असल्याप्रमाणे गुर्मीची भाषा वापरून महिलांना धमक्या देतात. विरोधकांच्या धमक्यांचे हे प्रेशर कायमचे बंद करण्यासाठी ‘प्रेशर कुकर’ पुढील बटन दाबा आणि राजेश लाटकर या आपल्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला आमदार बनवा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
जुना बुधवार पेठ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला महिलांची अलोट गर्दी झाली होती. सभेत बोलताना, उत्तरचे उत्तर हे फक्त राजू लाटकर आणि प्रेशर कुकर आहे, असे आमदार सतेज पाटील म्हणताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांना अनुमोदन दिले.
संविधान बदलण्याचा प्रयत्न, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार, बदलापूरची घटना, महिलांचा अवमान, महागाईचा कडेलोट, सर्वसामान्यांची लूट, असे किती कारनामे या सरकारचे सांगायचे. अशावेळी राज्यातील १३ कोटी जनतेने निर्णय घेतला आहे की, गद्दारी करून सत्तेवर आलेल्या या भ्रष्ट सरकारला येत्या २० तारखेला हद्दपार करायचे आहे, असे पाटील म्हणाले.
शहराचा शाश्वत विकास घडविण्याबरोबरच पेठापेठातील नियोजनबद्ध कामे करण्यासाठी माझ्यासारख्या महापालिकेत काम केलेल्या कार्यकर्त्याला तुमचे मतदान द्या आणि मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या, असे आवाहन राजेश लाटकर यांनी केले.
यावेळी संजय पवार, विजय देवणे, धनंजय सावंत यांची भाषणे झाली. विद्या घोरपडे यांनी आभार मानले. यावेळी आर. के. पोवार, सचिन चव्हाण, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, प्रतिज्ञा उत्तुरे, जय पटकारे, सतीशचंद्र कांबळे, सुशील भांदिगरे, विजय सावंत, बाबासाहेब देवकर, चंदा बेलेकर, प्राचार्य टी. एस. पाटील, रजनीकांत सरनाईक, स्वाती काळे, भारती पोवार, विनायक क्षीरसागर, बाबासाहेब देवकर, दिलीप पवार आदी उपस्थित होते.