हातात ‘धनुष्या’ऐवजी ‘घड्याळा’साठी दबाव-: सतेज पाटील यांची विरोधाची धार बोथट करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 01:07 AM2019-03-20T01:07:07+5:302019-03-20T01:09:29+5:30
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरोधात उघडलेल्या मोहिमेची धार बोथट करण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्टवादी काँग्रेसच्या
कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरोधात उघडलेल्या मोहिमेची धार बोथट करण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्टवादी काँग्रेसच्या पातळीवर सुरू आहे. पाटील यांच्या विरोधी प्रचाराची गंभीर दखल घेतली असून, दोन दिवसांत ‘हायकमांड‘कडून काही तरी फर्मान येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विधानसभेच्या सन २००९ च्या निवडणुकीपासून जिल्ह्यात महाडिक-सतेज पाटील संघर्ष सुरू आहे. मागील लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून दोघांमध्ये समझोता घडविला. त्यामध्ये आमदार हसन मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती; पण लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पाटील यांच्या विरोधात अमल महाडिक यांना रिंगणात उतरले आणि पुन्हा संघर्ष पेटला. गेली पाच वर्षे या संघर्षाची धार अधिक तीव्र होत गेली. आता लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली, पण आमदार पाटील यांनी महाडिक यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे आमदार असतानाही त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर जाऊन प्रचार सुरू केला. त्यांच्या या भूमिकेने काँग्रेसमध्ये अस्वस्थता असली तरी याबाबत उघड विचारणा करण्याचे धाडस कोणी करायचे? असा पेच काँग्रेसअंतर्गत आहे.
गेल्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी दोन्ही नेत्यांत समेट घडवून आणला होता, आता त्यांनी त्यासाठी वेळ घालवणार नसल्याचे सांगत यातून अंग काढून घेतले.पाटील यांचा विरोध असायला हरकत नाही; पण त्यांनी उघड टोकाची भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाटील यांनी शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचाराची सारी यंत्रणा हातात घेतल्याची कात्रणे वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याची गंभीर दखल दोन्ही काँग्रेसच्या पातळीवर घेतल्याचे समजते. येत्या दोन दिवसांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पातळीवर चर्चा होणार आहे. प्रचारात सक्रिय व्हायचे राहू दे, पण किमान पाटील यांच्या विरोधाची धार कशी बोथट करता येईल, यासाठी फर्मान निघेल, अशी चर्चा दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू आहे.
चुकीचा संदेश जाण्याअगोदर आवरा!
दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेत भाजपला रोखण्याची व्यूहरचना आखली असताना कोल्हापुरात काँग्रेसचे आमदार उघड शिवसेनेच्या प्रचारात आहेत. हा संदेश महाराष्टÑात गेला तर दोन्ही काँग्रेसमध्ये अंतर्गत दुफळी माजेल, अशी भीती राष्टÑवादीला आहे. त्यामुळे चुकीचा संदेश इतर मतदारसंघांत जाण्याअगोदर पाटील यांना आवरण्याचे प्रयत्न सुरू आहेत.