Kolhapur: लखन खाडे यांना खनिकर्म कार्यालयात रुजू करून घेण्यासाठी मंत्रालयातून दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 02:10 PM2024-09-09T14:10:13+5:302024-09-09T14:13:11+5:30
इंदुमती गणेश कोल्हापूर : लखन खाडे यांना जिल्हा खनिकर्म कार्यालयात रुजू करून घेण्यासाठी मंत्रालय पातळीवरून दबाव आणला जात आहे. ...
इंदुमती गणेश
कोल्हापूर : लखन खाडे यांना जिल्हा खनिकर्म कार्यालयात रुजू करून घेण्यासाठी मंत्रालय पातळीवरून दबाव आणला जात आहे. एका महसूल सहायकांसाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून टाकला जाणारा हा दबाव हा संशोधनाचा विषय झाला आहे. त्यासाठी त्यांनी काही अर्थपूर्ण घडामोडी केल्याची माहिती आहे.
खाडे यांची सहा महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यासन क्रमांक सात येथे नियुक्ती झाली आहे. मात्र, त्यानंतर लगेचच त्यांनी जिल्हा खनिकर्म कार्यालयात बदली करून घेण्यासाठी हालचाली चालू केल्या. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची बदली अत्यंत तत्परतेने त्या कार्यालयात केलीदेखील. मात्र, तेथे खाडे रुजू होण्यापूर्वीच त्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली. त्यात बदलीची ऑर्डर काढायला उशीर झाला, तोपर्यंत नवीन जिल्हाधिकारी अमोल येडगे हे रुजू झाले.
दुसरीकडे खनिकर्म विभागातील कोणत्याच कर्मचाऱ्याचा कार्यकाल संपलेला नव्हता. त्यामुळे त्या कार्यालयाने खाडे यांना रुजू करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर गेले सहा सात महिने हे प्रकरण रेंगाळत पडले आहे. तरीही मागील आठ दिवसांमध्ये मंत्रालय स्तरावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर व खनिकर्म विभागावर खाडे यांना रुजू करून घेण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात आहे. त्यासाठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचीही चर्चा आहे.
इकडे खाडे यांची चौकशी लागून, त्यांच्या नावाने दोन वेळा नोटिसा निघाल्याने, शिवाय गडहिंग्लज खनिकर्म कार्यालयातील वाईट अनुभव असल्याने अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी त्यांना खनिकर्ममध्ये रुजू करून घेण्यास नकार दिल्याचे समजते.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सेटिंग..
खाडे हे कधीच आपल्या टेबलवर उपस्थित नसतात. आपल्या टेबलचे काम करण्यासाठी त्यांनी उमेदवाराची नियुक्ती केली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील एका चहाच्या दुकानात अर्थकारणाची चर्चा सुरू असते. अलीकडेच झालेल्या बदल्यांच्या बाबतीतदेखील तलाठ्यांसोबत सेटिंग्स लावल्या गेल्याचे कर्मचाऱ्यांनी फोन करून 'लोकमत'ला कळविले.
तहसीलदार नाराज..
गडहिंग्लजमधील कार्यकाळात खाडे यांनी तत्कालीन तहसीलदारांच्या नावावर क्रशरधारकांकडून पैसे घेतल्याची तक्रार झाली आहे. एक दिवस कारवाई सुरू असताना काही क्रशर मालकांनी आपल्याकडे पैसे पाठविल्याचे तहसीलदारांना सांगितले. मात्र, तहसीलदारांना या गोष्टीची कल्पनाच नव्हती. त्यांनी चौकशी केल्यानंतर हे पैसे खाडे यांच्याकडे दिल्याचे समजले. शिवाय त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी असल्याने त्यांचे टेबल बदलण्यात आले होते.
उलटा न्याय..
एखादा कर्मचारी चांगला असेल आणि त्याला बदली हवी असेल तर अधिकारी पन्नास कारणे सांगतात आणि ज्याच्याबद्दल अपहाराची तक्रार झाली आहे, त्याला पुन्हा त्याच विभागात नियुक्ती देण्यामागे अपहाराचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी काही वरिष्ठ त्यात मदत करीत आहेत.