घरफाळा घोटाळा प्रकरणात अधिकाऱ्यांवर दबाव, महापालिका सभेत आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 06:25 PM2020-08-24T18:25:30+5:302020-08-24T18:27:50+5:30
उच्च न्यायालयात आरोपीच्या जामीन अर्जावर कॅव्हेट दाखल करून आपली बाजू मांडली नाही, याचाच अर्थ घरफाळा घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांवर कोणाचा तरी दबाव आहे, असा आरोप सनसनाटी आरोप सोमवारी झालेल्या महापालिका सभेत प्रा. जयंत पाटील यांनी केला.
कोल्हापूर : उच्च न्यायालयात आरोपीच्या जामीन अर्जावर कॅव्हेट दाखल करून आपली बाजू मांडली नाही, याचाच अर्थ घरफाळा घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांवर कोणाचा तरी दबाव आहे, असा आरोप सनसनाटी आरोप सोमवारी झालेल्या महापालिका सभेत प्रा. जयंत पाटील यांनी केला.
भूपाल शेटे यांनी चौकशी समितीचा अहवालच बोगस असल्याचा आरोप केला. यावेळी पाटील-शेटे यांच्यात बरीच जुगलबंदी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या.
घरफाळा घोटाळ्यातील दोन आरोपींनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून तो नाकारला जावा म्हणून पोलीस तसेच महापालिका प्रशासनाच्यावतीने बाजू मांडली नाही. महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असताना जर आरोपी कारवाईपासून बचाव करण्याचा प्रयत्न करणार असतील तर महापालिका प्रशासनानेही आक्रमकपणे न्यायालयात बाजू मांडली पाहिजे होती. प्रशासन याप्रकरणी गंभीर आहे की नाही, अशी विचारणा प्रा. पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाचा निषेधही केला.