...म्हणे माझ्या मुखातून स्वामी समर्थ, साईबाबा बोलतात; भोंदूबाबाकडून चार कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 07:16 PM2020-05-29T19:16:33+5:302020-05-29T20:31:55+5:30

जुना राजवाडा पोलिसांत शुक्रवारी फिर्याद दाखल

Pretending that Swami Samarth and Sai Baba speak, fraud of Rs 4 crore by Bhondubaba | ...म्हणे माझ्या मुखातून स्वामी समर्थ, साईबाबा बोलतात; भोंदूबाबाकडून चार कोटींची फसवणूक

...म्हणे माझ्या मुखातून स्वामी समर्थ, साईबाबा बोलतात; भोंदूबाबाकडून चार कोटींची फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देस्वामी समर्थ व साईबाबा बोलतात, असे भासवून भोंदूबाबाकडून चार कोटींची फसवणूकमहिलेसह तिघांना अटक :कोल्हापूरातील धक्कादायक प्रकार

कोल्हापूर : आपल्या मुखातून साक्षात स्वामी समर्थ व साईबाबा बोलतात, असे भासवून संदीप प्रकाश नंदगांवकर (वय ३८, व्यवसाय : व्यापार, रा. ७४१/२, सुबल रेसिडेन्सी, देवकर पाणंद) या भक्तांकडून फ्लॅट, मठ व राधानगरी येथील गोशाळेसाठी तब्बल ३५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत शुक्रवारी फिर्याद दाखल झाली.

या प्रकरणी संशयित भोंदूबाबा प्रवीण विजय फडणीस (४४, रा. १७३१/३८, बी वॉर्ड, सिद्धाळ‌ा गार्डनमागील परिसर, मंगळवार पेठ), श्रीधर नारायण सहस्रबुद्धे (५५, रा. प्लॉट नं. ६१, सासने बिल्डिंग, चौथा बसस्टॉप, फुलेवाडी), सविता अनिल अष्टेकर (३५, रा. मंगळवार पेठ) या तिघांना पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. या तिघांविरुद्ध आतापर्यंत १२ लोकांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी केल्या आहेत.

किमान तीन कोटी ८६ लाख ६६ हजार ९९० रुपये रोख व कर्ज काढून आणि नऊ लाख ६७ हजारांचे सोन्याचे दागिने अशी एकत्रित तीन कोटी ९६ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. श्रीधर सहस्रबु्द्धे हा फडणीस याचा गुरू आहे व सविता अष्टेकर ही महिला मठातील सेवेकरी आहे. ती पतीपासून विभक्त राहून हे काम करीत होती.

या तिघांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्यापुढे हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयिताच्या मंगळवार पेठ (मठ) घरातून पोलिसांनी एक तलवार, डीव्हीआर, संगणक सीपीयू, कागदपत्रे, आदी साहित्य जप्त केले.

संशयित फडणीस याने अनेक दाम्पत्यांना दोघांना एकमेकांपासून धोका आहे, असे सांगून विभक्त राहण्यास भाग पाडले व त्यांची फसवणूक केल्याचे चौकशीत पुढे आले आहे. याबाबत घटनास्थ‌ळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फडणीस हा स्वामी समर्थांचा भक्त आहे. त्याचा मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन परिसरात मठ आहे. तिथे तो भक्तांना आपल्या अंगात स्वामी समर्थ आणि साईबाबा संचारतात असे सांगत असे. नियमित येणाऱ्या भक्तांचा त्याने विश्वास संपादन केला व त्यातून गोशाळा व अन्य कामांसाठी वेळोवेळी पैसे घेतले.

फसवणूक झालेल्यांमध्ये ओंकार किशोर बाजी, मंदार शिरीष दीक्षित, रेणुका अरविंद चिंगरे, विद्या गिरीश दीक्षित, केदार शिरीष दीक्षित, रूपा किशोर बाजी, दीपा नारायण बाजी, शहाजी हिंदूराव पाटील, गोविंद लक्ष्मण जोशी, मीनाक्षी मिलिंद करी, एकता जयंत जोशी, जयंत मानव जोशी (सर्व रा. मंगळवार पेठ व देवकर पाणंद परिसर) या भक्तांचीही अशाच प्रकारे फसवणूक करून त्यांनाही या संशयिताने लुबाडले आहे.

या फसवणुकीविरोधात नंदगांवकर यांच्या मुख्य फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसांत महाराष्ट्र नरबळी, अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा सन २०१३ चे कलम २ (१) (बी) (५) (८) प्रमाणे भारतीय दंडविधान कलम ४२०, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मध्यरात्री स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या घटनेचा तपास फौजदार योगेश पाटील हे करीत आहेत.

चक्क देवच अंगात संचारला...!

स्वामी समर्थ व साईबाबांचे कोट्यवधी भाविक आहेत. त्यांच्या मंदिरात जाऊन भाविकांना मानसिक शांतता मिळते. कित्येक भाविक असे आहेत की, सकाळी उठल्यावर स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही. कोणत्याही संकटात स्वामी आपल्या पाठीशी राहतात अशी श्रद्धा असणारा मोठा वर्ग आहे.

भाविकांच्या या श्रद्धाळूपणाचा या भोंदूंनी गैरफायदा घेतला आहे. स्वामी समर्थ असतील किंवा साईबाबा; हे काही कधी कुणाच्या अंगात येत नाहीत; परंतु या भोंदूंनी ते अंगात संचारतात असे सांगून व देवच आपल्या मुखातून बोलतात, असे भासवून फसवणूक केल्याचे तपासात पुढे आले आहे.

 

Web Title: Pretending that Swami Samarth and Sai Baba speak, fraud of Rs 4 crore by Bhondubaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.