धर्माच्या नावाखाली प्रचलित आचार-विचारांची तपासणी करायला हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:23 AM2021-04-15T04:23:25+5:302021-04-15T04:23:25+5:30
गडहिंग्लज : समाजासमोर आणि विशेषत: भावी पिढीसमोर आपण त्रिकालाबाधित सत्यच मांडले पाहिजे. त्यासाठी धर्माच्या नावाखाली समाजातील प्रचलित आचार-विचारांची पुरोगामी ...
गडहिंग्लज :
समाजासमोर आणि विशेषत: भावी पिढीसमोर आपण त्रिकालाबाधित सत्यच मांडले पाहिजे. त्यासाठी धर्माच्या नावाखाली समाजातील प्रचलित आचार-विचारांची पुरोगामी आणि व्यापक दृष्टिकोनातून तपासणी करायला हवी, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
येथील शिवराज विद्या संकुलाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या ‘सत्यशोधक महात्मा बसवेश्वर’ व ‘स्वयंसिद्धा महाराणी कैकेयीची कैफियत’ या पुस्तकांच्या ऑनलाइन प्रकाशनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. कौतिकराव ढाले-पाटील, श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सबनीस म्हणाले, मानवी समाजाच्या इतिहासात स्त्रियांचे हक्क सिद्ध करण्यासाठी बंडखोर भूमिका घेणाऱ्या ‘महाराणी कैकेयी’विषयीचे सखोल चिंतन अनुकरणीय आहे. तिच्या माध्यमातून जगातील अर्ध्या मानवजातीविषयी कुराडे यांनी केलेले लेखन स्वीकारणीय आहे.
याप्रसंगी शिक्षणमंत्री सामंत यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन झाले. स्वामीजी यांनी आपल्या भाषणातून पुस्तकांचे विविध भाषांत रूपांतर करून जगभर पोहचविण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी संस्था सचिव अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, अॅड. दिग्विजय कुराडे, बसवराज आजरी, सोमगोंडा आरबोळे, महेश तुरबतमठ, महेश आरभावी आदी उपस्थित होते.
ग्रंथपाल संदीप कुराडे, उमेश कानडे, प्रसाद गोयल, विक्रम शिंदे, अक्षय पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
तानाजी चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. कुंडलिक अतकरे यांनी आभार मानले.
------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे प्रा. किसनराव कुराडे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन सोमगोंडा आरबोळे, बसवराज आजरी, महेश तुरबतमठ, अनिल कुराडे, दिग्विजय कुराडे यांनी केले.
क्रमांक : १४०४२०२१-गड-०२