धर्मांध गुंडगिरी रोखावी
By admin | Published: April 30, 2016 12:09 AM2016-04-30T00:09:20+5:302016-04-30T00:43:16+5:30
श्रीपाल सबनीस : मायबोली प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार सोहळा
राधानगरी : जातीच्या नासकेपणातून दहशतवाद जन्माला येतो. धार्मिक, राजकीय, झोपडपट्टीदादा व यांसारख्या अन्य गुंडगिरीपेक्षा धार्मिक गुंडगिरीचा समाजावर विपरीत परिणाम होत आहे. इस्लामचा शांती संदेश समजून न घेता काही विकृती निर्माण होते. तसेच हिंदू धर्माला काळिमा फासणारे काही वाचाळ महाराज निर्माण झाले आहेत. त्यामुळे धर्मांध गुंडगिरी रोखणे हेच सर्व प्रकारच्या लेखकांचे उद्दिष्ट असायला पाहिजे. कोणत्याही भीतीला न डगमगता लेखणीचा वापर करणे आवश्यक आहे, असे परखड मत ज्येष्ठ समीक्षक व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. येथील मायबोली साहित्य प्रतिष्ठानच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. ग्रामीण साहित्यिक कृष्णात खोत अध्यक्षस्थानी होते. यावेळी विविध कार्यक्रम झाले.
यावेळी सबनीस म्हणाले, जगभरात फैलावणारा दहशतवाद रोखणे हे सर्व राष्ट्रांपुढील मोठे आव्हान आहे. सर्व देश यासाठी एकत्र येत आहेत. सत्य, अहिंसा व शांततेचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान जगभरात पसरत आहे. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा गांधी विचाराने प्रभावित आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात फिरताना गांधी, बुद्ध व भगवान महावीरांच्या विचारांचा प्रचार करतात. सांस्कृतिक एकतावाद हा नवा राष्ट्रवाद व्हावा. सेक्युलर भारत निर्माण होऊन जातीव्यवस्था संपण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
मातीशी इमान राखणाऱ्या ग्रामीण प्रतिभा व परंपरा वंदनीय आहेत. बोलीशी जोडलेली भाषा व खेड्यातील सांस्कृतिक श्रीमंती हेच खरे धन आहे, असे गौरवोद्गार सबनीस यांनी काढले.
यावेळी कृष्णात खोत म्हणाले, सर्वच क्षेत्रांत सर्व प्रकारची दहशत वाढली आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याची मुभा नाही, हीसुद्धा एक प्रकारची दहशतच आहे. निसर्गवाद हा जीवनाचा मंत्र झाला, तरच जगणे सुसह्य होईल.
यावेळी सुनील माने, किरण गुरव, प्रकाश काणकेकर, चंद्रशेखर कांबळे, संजय पारकर, मधुकर मुसळे, संजय डवर, साताप्पा शेरवाडे, सुचित वंजारे, सुरेश चौरे यांचा सत्कार करण्यात आला. कवी बाळ पोतदार यांच्या ‘येणे वाग्यज्ञे’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. गोविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यावेळी जि. प. शिक्षण समितीचे सभापती अभिजित तायशेटे, प्रांताधिकारी मोनिका सिंह, तहसीलदार शिवाजी शिंदे, सरपंच सुनीता गुरव, विलास पाटील उपस्थित होते. प्रा. चंद्रशेखर कांबळे यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)