सीमाभागातील अवैध मद्यतस्करी रोखा; महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 03:49 PM2024-10-19T15:49:52+5:302024-10-19T15:51:05+5:30
कोल्हापूर : कर्नाटक आणि गोवा या सीमावर्ती भागातील राज्यातून अवैधरीत्या मद्याची तस्करी, साठवणूक, विक्री, आयात, निर्यात होणार नाही, याची ...
कोल्हापूर : कर्नाटक आणि गोवा या सीमावर्ती भागातील राज्यातून अवैधरीत्या मद्याची तस्करी, साठवणूक, विक्री, आयात, निर्यात होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील अधिकाऱ्यांच्या आंतरराज्य सीमावर्ती समन्वय बैठकीत करण्यात आल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी मद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये निवडणूक कालावधीत सीमावर्ती भागातील ५ किलोमीटर अंतरात कोरडे दिवस जाहीर करावेत, अशी विनंती कर्नाटक आणि गोवा राज्याच्या उपायुक्तांना केली. सीमावर्ती भागात सामूहिक छापे मोहीम, रात्र गस्तीसह सराईत गुन्हेगारावर नजर ठेवण्याच्या सूचना केल्या.
बैठकीस बेळगांव उत्तरचे उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त के. अरुणकुमार, बेळगाव दक्षिणचे उपायुक्त वनक्षी, विजयपुराचे उपायुक्त एस. होसाली यांच्यासह तिन्ही राज्यांचे उत्पादन शुल्क अधिकारी उपस्थित होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी बैठकीचे नियोजन केले.