वेदगंगा नदीतील प्रदूषण रोखा
By admin | Published: November 30, 2015 11:48 PM2015-11-30T23:48:07+5:302015-12-01T00:15:52+5:30
भुदरगड संघर्ष समितीची मागणी : गारगोटीतील सांडपाण्यावर उपाय करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
गारगोटी : गारगोटीचा विस्तार झपाट्याने होत आहे; मात्र पर्यावरणसंदर्भात फारसे गांभीर्य नसल्याने गावाचे सांडपाणी वेदगंगा नदीत मिसळते. परिणामी नदीचे पाणी दूषित होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित खात्यास आदेश द्यावे, या मागणीचे निवेदन भुदरगड तालुका संघर्ष समिती यांच्या वतीने तहसीलदार शिल्पा ओसवाल यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गारगोटी गावातील बहुतांश सांडपाणी वेदगंगा नदीत मिसळते. १२ लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेली पाणी टाकी निकामी झाली असल्याने सहा लाख लिटर पाणी साठवून त्यांचे वाटप केले जाते. यातील चार लाख लिटर पाणी हे सांडपाणी रूपात वेदगंगेत मिसळते. रेखानगर, शिवाजीनगर, नवीन बसस्थानकजवळील वसाहतीचे सांडपाणी ओढ्याला जाऊन ते नदीत मिसळते. मौनी विद्यापीठ ते गारगोटी बाजारपेठेतील पाणी कैदी घाटावर, सोनाळीतील सांडपाणी सोनाळी घाटावर, जुनी गारगोटीचे पाणी तुळसी घाटावर जाऊन नदीत मिसळते. यामुळे वेदगंगा नदीचे पाणी दूषित होत आहे. संबंधित प्रशासन स्वच्छ गारगोटी, सुंदर गारगोटी अभियान राबवीत आहे. मात्र, त्यापूर्वी शहराच्या सांडपाण्याची निर्गत लावून नदीचे प्रदूषण रोखावे यासाठी ग्रामपंचायतीने युद्धपातळीवर प्रयत्न करावे, अन्यथा संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देण्यासाठी अमित देसाई, शरद मोरे, भाजप तालुकाध्यक्ष आलकेश कांदळकर, प्रकाश वास्कर, बजरंग कुरळे, अशोक जगताप, आदित्य देसाई, संग्राम फोफळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.