मुरलीधर जाधवांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By admin | Published: February 11, 2015 12:12 AM2015-02-11T00:12:00+5:302015-02-11T00:15:44+5:30
क्रिकेट बेटिंग प्रकरण : दोन पंटरांवरही राजारामपुरी पोलिसांची कारवाई
कोल्हापूर : विश्वचषक स्पर्धेदरम्यान क्रिकेट सट्टा जोमाने सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट सट्टा प्रकरणात अडकलेले महापालिकेचे विरोधी पक्षनेते, नगरसेवक मुरलीधर पांडुरंग जाधव (वय ४६, रा. राजारामपुरी) याच्यासह त्याच्या दोघा पंटरांवर राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी प्रतिबंधात्मक कारवाई केली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई केली.
टाकाळा येथील नगरसेवक जाधव यांच्या जयंत रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये २३ जानेवारीला राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकला असता पंटर प्रकाश श्रीचंद जग्याशी (४०) व लक्ष्मण सफरमल कट्यार (२५, रा. गांधीनगर) हे दोघे आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडच्या सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा घेताना मिळाले होते. याप्रकरणी नगरसेवक जाधव यांनी जामीन मिळविला होता. मात्र प्रशासनाने जाधव यांचा जामीन रद्द करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात रिव्हिजन (अपील) दाखल केले आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान क्रिकेट सट्टा होवू शकतो. त्यामुळे गैरकृत्यांना आळा बसावा, यासाठी नगरसेवक जाधव व त्यांच्या पंटरांवर कारवाई केली.
राजकीय दबावामुळेच कारवाई : जाधव
गेली दहा वर्षे नगरसेवक आहे. कुटुंबीयांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. बेटिंगप्रकरणी पोलिसांनी छापा टाकून अटक केलेले संशयित व संबंधित फ्लॅटशी काहीही संबंध नाही. न्यायालयानेही ही बाजू ग्राह्य धरत अटकपूर्व जामीन मंजूर केला. पोलिसांना संपूर्ण तपासकामात सहकार्य करत असताना पोलीस निव्वळ राजकीय दबावापोटी प्रतिबंधात्मक कारवाई करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
जाधवचा रूबाब
अंगामध्ये पांढराशुभ्र पोशाख, हातामध्ये किमती मोबाईल अशा पेहराव्यात नगरसेवक जाधव महापालिकेच्या आलिशान गाडीतून सकाळी अकराला पोलीस ठाण्यात आले. पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी त्यांच्यासह पंटरांवर ‘कलम १०७’ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली. ठाण्यातील दप्तरी कक्षामध्ये त्यांच्याकडून जबाब लिहून घेतले.मुख्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर चांगल्या वर्तवणुकीचा बाँड लिहून घेवून त्यांची सुटका केली.