दादांच्या निवासस्थानावर जाणाऱ्या मोर्चेकऱ्यांना रोखले
By admin | Published: October 17, 2016 01:09 AM2016-10-17T01:09:11+5:302016-10-17T01:09:11+5:30
‘भारत अगेन्स्ट करप्शन’तर्फे आंदोलन : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले मिळावेत
कोल्हापूर : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस. टी.)चे दाखले मिळावेत, या मागणीसह मराठा समाजाला आरक्षण मिळावे, उसाला ‘एमआरपी’ मिळावी, आदी मागण्यांसाठी ‘भारत अगेन्स्ट करप्शन’तर्फे रविवारी कोल्हापुरात महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानाकडे जाणाऱ्या मोर्चेकऱ्यांना जुना राजवाडा पोलिसांनी रोखले. सुभाष रोडवरील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे सर्व आंदोलक जमले होते; पण मोर्चा काढण्यापूर्वी आंदोलकांना याठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतले.
धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी मुंबईत एक आॅगस्ट २०१६ रोजी विधानभवनावर जेल भरो मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी शिष्टमंडळास मध्यस्थी करून महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा व सकारात्मक निर्णय घेण्यासाठी चार दिवसांत बैठक लावतो, असे आश्वासन दिले होते. पण, तीन महिने होऊनही पालकमंत्री पाटील यांनी कोणताही निर्णय घेतला नाही.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.)चे दाखले देण्याचे अधिकार महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांना देण्यात यावेत, या मागणीसाठी रविवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संभाजीनगर, नाळे कॉलनीतील निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार होता. त्यासाठी ‘भारत अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण सुभाष रोडवरील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे सर्व आंदोलक जमले. या ठिकाणी त्यांनी पालकमंत्री पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी करून धनगर समाजाला त्वरित अनुसूचित जमातीचे दाखले मिळावेत, अशी मागणी केली. यावेळी मोर्चा काढण्यापूर्वी पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. थोड्या वेळाने आंदोलकांना सोडून दिले.
आंदोलनात राज्य अध्यक्ष संतोष बिसुरे, राजूभाई पंजाबी, राहुल जैन, अशोक लिपारे, संजय बाबर , दस्तगीर आगा, प्रकाश काळे (कऱ्हाड तालुका), सातारा महिला जिल्हाध्यक्ष कुसुम शेवाळे, सुनीता कांबरे, बानू काझी, कुमार डोईफोडे, सतीश घाटगे, उमेश माटुंगे, आदींचा सहभाग होता.