कोल्हापूर जिल्ह्यात दुधाचे दर शासन निश्चित दरापेक्षा जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 01:17 PM2022-05-25T13:17:26+5:302022-05-25T13:17:57+5:30
राज्यात दूध उत्पादनात अहमदनगर, सोलापूर व काेल्हापूर जिल्हे आघाडीवर आहेत
कोल्हापूर : राज्य शासनाने दुधाच्या एफआरपीबाबत समितीची नेमणुकीच्या निर्णयाने दूध उत्पादकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. मात्र, यापूर्वी राज्य शासनाने निश्चित केलेल्या दुधाच्या किमान दरापेक्षा कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना अधिकचा दर मिळत आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील दूध उत्पादकांसाठी ‘एफआरपी’चा निर्णय फायदेशीर असून, दूध संघांवर अंकुश ठेवण्यास मदत होणार आहे.
शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय उदयास आला. मात्र, अलीकडे त्यामध्ये झपाट्याने वाढ होत गेली. ग्रामीण भागात हा व्यवसाय प्रमुख म्हणून पुढे आला. साखर कारखान्यांकडून उसाची बिले वेळेत मिळत नसल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा, असा प्रश्न असताना दूध व्यवसायाने या कुटुंबांना तारण्याचे काम केले.
राज्यात दूध उत्पादनात अहमदनगर, सोलापूर व काेल्हापूर जिल्हे आघाडीवर आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात दूध दर चांगले आहेत. विशेष म्हणजे, कोल्हापूरात म्हैस दूधाचे प्रमाण अधिक आहे. त्यातही म्हैस दुधाला मुंबई, पुणे मार्केटमध्ये मागणी अधिक असल्याने दूध कमी पडते. एकूणच दूध संकलनातील स्पर्धेमुळे येथे गाय व म्हैस दूध दर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहेत. मध्यंतरी दूध अतिरिक्त झाल्यानंतर दूध खरेदी दर झपाट्याने घसरले. खासगी दूध संघांनी गाईचे दूध १८ ते २० लिटरने खरेदी केले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गोकुळ’ दूध संघाने शासनाच्या किमान दराने प्रतिलिटर २५ रुपयांप्रमाणे खरेदी केले.
उसाप्रमाणे दुधाचा दर
दुधाची एफआरपीबाबत समिती नेमली आहे. ही समिती अभ्यास करून उसाप्रमाणे दुधाचा दर निश्चित करणार आहेत. ही बाब दूध उत्पादकांच्या साठी दिलासादायक आहे. त्याचा फायदा मराठवाडा व विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
स्पर्धेमुळे पश्चिम महाराष्ट्रात दर चांगले
कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात बहुतांशी दूध संकलन हे सहकारी दूध संघांच्या माध्यमातून होते. त्यामुळे दूध संकलनातील स्पर्धा दूध दरापर्यंत जात असल्याने राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुनलेत पश्चिम महाराष्ट्रात नेहमीच दर चांगले राहिले आहेत.
खासगी दूध संघांना बंधनकारक असावे उसाच्या एफआरपीचा कायदा केंद्र सरकारचा आहे. हा कायदा सहकारी साखर कारखान्यांबरोबरच खासगी कारखान्यांसाठी बंधनकारक आहे. त्याप्रमाणे दुधाच्या एफआरपीचा कायदा होणे अपेक्षित आहे. तरच या कायद्याचा फायदा सामान्य दूध उत्पादकांसाठी होऊ शकतो.
सध्याचा दुधाचा किमान हमीभाव
दूध फॅट एसएनएफ किमान दर
गाय ३.५ ८.५ २५ रुपये
म्हैस ६.० ९.० ४० रुपये