महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मूल्यशिक्षण आवश्यक : ज्योती शेट्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 02:37 PM2020-02-13T14:37:16+5:302020-02-13T14:38:13+5:30
केवळ कायदे केले म्हणून हा प्रश्न निकालात निघेल, असे नाही. यासाठी कुटुंबापासून त्याची सुरुवात होणे आवश्यक आहे. मुलगा आणि मुलगी असा भेद करणे सर्वप्रथम थांबले पाहिजे
कोल्हापूर : महिलांवर होणारे अत्याचार चिंताजनक आहेत. केवळ कायदे करून हा प्रश्न सुटणार नाही. कायद्याबरोबरच कुटुंबातील संस्कार आणि मूल्यशिक्षणावर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महिलांसंदर्भातील कायद्याच्या अभ्यासक ज्योती शेट्ये यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्यावतीने आयोजित व्याख्यानात त्यांनी ‘महिला अत्याचार प्रतिबंधक कायदे’ या विषयावर मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. निशा पवार होत्या. ज्योती शेट्ये म्हणाल्या, महिलांना कायद्याचे संरक्षक कवच आहे. महिला व मुलींवरील अत्याचार थांबावेत यासाठी महाविद्यालये, विद्यापीठे तसेच अन्य संस्थांमध्येही अनेक उपाययोजना केल्या आहेत. एवढे करूनही समाजात महिला असुरक्षित आहेत. केवळ कायदे केले म्हणून हा प्रश्न निकालात निघेल, असे नाही. यासाठी कुटुंबापासून त्याची सुरुवात होणे आवश्यक आहे. मुलगा आणि मुलगी असा भेद करणे सर्वप्रथम थांबले पाहिजे
मुलीला समान दर्जा मिळत नाही, तोवर या प्रश्नाची तीव्रता कमी होणार नाही. महिलांना आदराचे स्थान मिळवून देण्यासाठी कायद्यापेक्षा मूल्यशिक्षण प्रभावी भूमिका बजावू शकेल. यासाठी प्रत्येक टप्प्यावर शिक्षणव्यवस्थेत मूल्यशिक्षणाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमास डॉ. सुमेधा साळुंखे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. शिवाजी जाधव यांनी आभार मानले.