तूरडाळीचा भाव आला ऐंशी रुपयांवर
By admin | Published: January 30, 2017 12:38 AM2017-01-30T00:38:32+5:302017-01-30T00:38:32+5:30
भाजीपाल्याचे दर स्थिर : साखर, शाबू, खोबऱ्याच्या दरात काही प्रमाणात वाढ
कोल्हापूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत डाळींच्या दरांत घसरण झाली असून, किरकोळ बाजारात तूरडाळ ऐंशी रुपयांपर्यंत खाली आली आहे. साखर, शाबू व खोबऱ्याच्या दरांत वाढ झाली असून, सरकी तेलाच्या दरात मात्र थोडी घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर तुलनात्मकदृष्ट्या स्थिर आहेत. फळबाजारात अपेक्षित तेजी दिसत नाही.
यंदा पाऊस चांगला झाल्याने तूर व हरभराचे उत्पादन वाढले आहे. परिणामी डाळींची आवक चांगली असल्याने दर कमी होत आहेत. तीन-चार महिन्यांपूर्वी १४० रुपयांपर्यंत असणारी तूरडाळ किरकोळ बाजारात या आठवड्यात ८० रुपयांवर आली आहे. हरभराडाळही १०० रुपयांवर स्थिर असून मूग व मूगडाळीच्या दरांत फारसा चढउतार दिसत नाही. सरकी तेल किलोमागे दोन रुपयांनी कमी झाले आहे. साखरेचे दर हळूहळू वाढत चालले आहेत. किरकोळ बाजारात साखर सध्या ४२ रुपये किलो आहे. शाबूची आवक काहीशी मंदावल्याने ८० रुपयांचा शाबू ८८ रुपयांवर गेला आहे. नारळाच्या दरात वाढ दिसत आहे. किरकोळ बाजारात १० रुपयांचा नारळ १५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे खोबरे व खोबरेल तेलाच्या दरांत वाढ झाली आहे.
फळ मार्केट सध्या शांत दिसत आहे. काश्मीर, सिमला, दिल्लीतून सफरचंदांची आवक कमी झाल्याने पेटीमागे १०० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. संत्री, माल्टा, मोसंबी, डाळिंबांचे दर कायम आहेत. फळांचा राजा आंब्याची अजून महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची आवक सुरू असून, लालभडक स्ट्रॉबेरी ग्राहकांना भुरळ घालत आहे.
ओला वाटाण्याची आवक अजूनही कमी नसल्याने घाऊक बाजारात सरासरी १६ रुपये किलोपर्यंत दर राहिला आहे. कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, पोकळ्याचे दर कायम आहेत. हरभऱ्याच्या पेंढीची आवक हळूहळू कमी होत चालली आहे.
कैऱ्यांची आवक वाढली!
बाजारात अजून आंबा येण्यास जरी विलंब असला तरी कैऱ्या दाखल झाल्या आहेत. रोज बाजार समितीत ५० ते ६० कैऱ्यांची आवक होते. साधारणत: ४० रुपये किलो दर मिळत आहे.
गूळ ४८ रुपयांवर
यंदा गुळाच्या दराने उच्चांक गाठला आहे. एक नंबर गुळाचा दर ४८९० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. गेले आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे २८० रुपयांची वाढ झाली असून, एक किलो बॉक्सच्या दरातही सरासरी ५० रुपयांची वाढ झाली आहे.