लाडक्या बहिणींना दीड हजार दिले, फोडणीला चार हजार गेले; आर्थिक बजेट कोलमडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 04:10 PM2024-10-18T16:10:40+5:302024-10-18T16:11:11+5:30

महागाईचा उच्चांक 

Prices of essential commodities increased, Due to inflation the financial budget collapsed | लाडक्या बहिणींना दीड हजार दिले, फोडणीला चार हजार गेले; आर्थिक बजेट कोलमडले

लाडक्या बहिणींना दीड हजार दिले, फोडणीला चार हजार गेले; आर्थिक बजेट कोलमडले

कोल्हापूर : दिवाळीच्या तोंडावर रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर भडकले आहेत. परिणामी शासनाने दर महिन्याला महिलांना दीड हजार रुपये दिले. मात्र महागाईमुळे त्यांचे दर महिन्याला कमीत कमी चार हजार रुपये जात आहेत, असे सध्याचे चित्र आहे. यामुळे लाडक्या बहिणीची फोडणी महाग झाली आहे. ज्वारीने तर किलोला अर्धशतक पूर्ण केल्याने गरिबांची भाकरी ताटात अधूनमधून येत आहे.

ऐन सणाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंचे दर भडकले आहेत. कांदा, बटाटा आणि टोमॅटो तर चाळीस रुपयांच्या आत येण्याचे नावच काढलेले नाही. गरीब, दोन ते चार सदस्य असलेल्या कुटुंबांना दर महिन्याला जीवनावश्यक वस्तूंसाठी पूर्वी दोन ते तीन हजार रुपये लागत होते. आता चार ते पाच हजार रुपये लागत आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबालाही दरवाढीचा जबर फटका बसला आहे. वीज, मोबाइल रिचार्ज, इंधन, गॅसचे, दुधाचे दर तर आधीच वाढले आहेत.

आता जीवनावश्यक वस्तूंतही घसघशीत वाढ झाल्याने गरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांच्या हातात पैसेच शिल्लक राहत नसल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या सरकारने महिलांच्या खात्यावर दर महिना दीड हजार रुपये जमा केले. पण त्याचवेळी खाद्य तेल, डाळ आदी खाद्य वस्तूंमध्ये वाढ झाली आहे.

गहू, तांदळाने पन्नाशी ओलांडलेलीच..

दैनंदनीत जेवणात लागणारी भाकरी, चपाती, भातासाठी ज्वारी, गहू, तांदळाच्या दरानेही पन्नाशी ओलांडली आहे. डाळींनी शंभरी ओलांडली आहे. गेल्या चार, पाच महिन्यांपासून याचे दर कमी झालेले नाहीत. खानावळीतील जेवणाचे दरही ताटाला कमीत कमी १० ते ३० रूपयांनी वाढवले आहेत. कोल्हापुरात आता शाकाहारी ताटाला कमीत कमी शंभर रुपये मोजावे लागत आहेत.

अलीकडे वाढ झालेल्या वस्तूंचे दर असे

वस्तू   :  जुना दर : नवीन दर
खाद्य तेल : ११० ते १२० : १४० ते १५५
हरभरा डाळ : १०० : ११० ते ११५
रवा, मैदा : ४४ : ४८
कांदा :  २५ ते ३० :  ४० ते ५०
बटाटा :  २५ : ३० ते ४०


सरकारने लाडकी बहिणी म्हणून दीड हजार देण्याऐवजी महागाई कमी केली असती दर बरे झाले असते. महिलांचे पैसे वाचले असते. - संध्या गायकवाड, गृहिणी, जिवबानाना पार्क, कोल्हापूर.
 

खाद्यतेल, रवा, बेसन, हरबरा डाळीचे दर भडकले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. दोन हजार रुपयांत होणाऱ्या बाजाराला चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. - रेश्मा देवार्डे, गृहिणी, शासकीय विश्रामगृह परिसर, कोल्हापूर

दर वाढल्याने दर महिन्याच्या घर खर्चात दोन ते अडीच हजार रुपयांची वाढ झाली आहे. कुटुंब चालवताना आर्थिक कसरत करावी लागत आहे. -मेघना गावडे, फुलेवाडी, कोल्हापूर

महागाई वाढवून दुसऱ्या बाजूने चार हजार रुपये काढून घेतले आहेत. महागाई वाढल्याने पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न पडत आहे. -रंजना पाटील, गृहिणी, कळंबा

Web Title: Prices of essential commodities increased, Due to inflation the financial budget collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.