गुजरातचा तीळ अन् सेंद्रिय गूळ संक्रांत करणार ‘गोड’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 05:25 PM2023-01-02T17:25:12+5:302023-01-02T17:25:55+5:30
संक्रांतीनंतर तिळाचे दर आणखी उतरण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर : गुजरातचा तीळ अन् सेंद्रिय गूळ यांचे दर सध्या स्थीर असल्याने, तसेच भविष्यातही दर वाढण्याची शक्यता नसल्याने, यंदाची संक्रांत गोड होणार आहे. संक्रांतीनंतर तिळाचे दर आणखी उतरण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
संक्रांतीला तीळ आणि गूळ याची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. त्याला मागणीही जास्त असते. त्यामुळेच मागणी वाढली की दर वाढतात, परंतु यंदा मात्र दरवाढ होण्याची शक्यता दिसत नाही. गुजरात, बार्शी येथून मोठ्या प्रमाणात तीळ बाजारात आला आहे. गूळ उत्पादनही चांगले आहे. त्यामुळे मागणी वाढली, तरी आवकही वाढली असल्याने दर स्थीर आहेत. त्यामुळे यंदा तीळ, गुळाचे दर वाढणार नाहीत, असा व्यापाऱ्यांचा दावा आहे.
गुजराती तीळ २०० रुपये किलो
बाजारात तीळ १४० रुपये किलो होते. काही महिन्यापूर्वी हा दर २०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तो सध्या स्थीर आहे. संक्रांत झाल्यानंतर पुन्हा २५ रुपयांनी दर कमी होणार असल्याचे सांगण्यात येते.
सेंद्रिय गूळ ९० रुपयांवर
घाऊक बाजारपेठेत सर्वसाधारण गुळाचे दर ३३ ते ४४ रुपये किलो आहेत, तर किरकोळ बाजारपेठेत तोच गूळ ५० रुपये किलो आहे. सेंद्रिय म्हणून विकला जाणारा गूळ मात्र ९० रुपये किलो आहे.
साखरही ४० रुपयांवर
साखरेचे दर गेल्या दीड वर्षापासून स्थीर आहेत. किरकोळ बाजारात साखरेचा किलोचा दर ३८ ते ४० रुपये आहे.
शेतकऱ्यांची तिळाकडे पाठ
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तीळ उत्पादन घेण्याकडे पाठ फिरविली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे तीळ उत्पादन कमी झाले. त्यामुळे बाजारपेठेत गुजरातहून तिळाची मोठी आवक सुरू आहे.
उत्पादन वाढले असल्याने गुळाचे दर स्थीर आहेत. साखरेपेक्षा गुळाचे दर हे २००रुपयांनी जास्तच असतील. - नीलेश पटेल, अध्यक्ष गूळ व्यापारी असोसिएशन
संक्रांतीला लागणारा गूळ गुजरात, कोकण येथून मागविण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथेही गुळाचे उत्पादन मोठे झाले आहे. त्यामुळे गुळाचे दर वाढण्याची शक्यता नाही. - निमेश वेद, गूळ व्यापारी.