डाळींच्या दरात वाढ
By Admin | Published: April 30, 2017 06:16 PM2017-04-30T18:16:00+5:302017-04-30T18:16:00+5:30
भाजीपाल्याचे दरही वधारले : फळमार्केट मध्ये रानमेव्यांची रेलचेल
लोकमत आॅनलाईन
कोल्हापूर, दि. ३0 : एकीकडे तुरीचे ढीग बाजारात दिसत असताना तुरडाळीच्या दरात मात्र दिवसेंदिवस वाढ होत आहे. किरकोळ बाजारात ७५ रूपयांपर्यंत तुरडाळ पोहचली असून हरभराडाळही ८५ रूपयापर्यंत पोहचली आहे. उन्हामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला असून त्याचे दरही वधारले आहेत. फळमार्केट मध्ये फणस, करवंदे, जांभळासह रानमेव्याची रेलचेल दिसत आहे.
तुरीवरून सारा महाराष्ट्र धगधगत असताना तुरडाळीच्या वाढणाऱ्या दरामुळे ग्राहक चांगलेच आवाक झाले आहेत. गेले आठवड्याच्या तुलनेत तुरडाळ, हरभराडाळ, मूगडाळीच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तुरडाळ ७५ तर उडीदडाळने शंभरी ओलांडली आहे. साखर ४२ रूपये किलो तर शेंगदाणा १०० रूपये किलोपर्यंत राहिला आहे. शाबू ८० ते ९० रूपये, पोहे ३५ रूपये किलो आहे.
उन्हामुळे भाज्यांच्या आवकेवर परिणाम झाला आहे. त्यात खरीप तयारीसाठी जमिनी तयार करण्याची लगबग शेतकऱ्यांची सुरू असल्याने स्थानिक भाजीपालाही कमी झाला आहे. परिणामी दर चांगलेच वधारले आहेत. वांगी ३०, गवार ४०, भेंडी ४०, ढब्बू ५०, दोडका ६० रूपये किलो दर आहे. पालेभाज्यांची मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठी तफावत असल्याने दर कमालीचे भडकले आहेत. मेथीची पेंढी १५ रूपये तर पोकळा दहा रूपया झाला आहे. कांदा-बटाट्याच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही.
फळमार्केट मध्ये आंबा, संत्री, मोसंबी, चिक्कू, डाळींब या फळांची आवक सुरू आहेच पण रानमेव्यांची रेलचेलही वाढली आहे. करवंदे, जांभूळ, फणस, रायवळ आंब्याची आवक सुरू आहे. वळीव पाऊस यंदा नसल्याने करवंदेची आवक थोडी कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. अननस, पपई व कलिंगडेची आवक चांगली आहे. लिंबूची मागणी वाढली असून किरकोळ बाजारात मध्यम आकाराचे लिंबू दहा रूपयाला पाच असा दर आहे. रत्नागिरी, देवगड हापूस बरोबर मद्रास हापूसची आवक सुरू असल्याने दर नियंत्रणात आहेत. रत्नागिरी हापूसचा बॉक्स सरासरी साडे तीनशे रूपयांपर्यंत दर आहे.
टोमॅटो घसरला
लाल भडक टोमॅटोला यंदा चांगले दिवस नसले तरी गेले दोन-तीन आठवडयापासून दरात थोडी वाढ झाली होती. किरकोळ बाजारात २० ते ३० रूपये किलोपर्यंत दर राहिला. पण आवक वाढल्याने दरात पुन्हा घसरण झाली असून दहा रूपये किलो पर्यंत दर खाली आला आहे.
फळमार्केट पिवळेधमक
हापूस, रायवळ, पायरी आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यात तोतापुरी आंब्याची आवकही चांगली असल्याने फळ मार्केट पिवळेधमक दिसत आहे.
आंबा आवक सरासरी दर रूपयात
हापूस ५२४२ बॉक्स ३५०
रायवळ ४७५० पेटी १००
मद्रास हापूस २३०० बॉक्स १७५
मद्रास पायरी ५५० बॉक्स १२०