Kolhapur: ‘मी सांगतो त्याप्रमाणे करा, तुमचे चांगले होईल’; भामट्या ज्योतिषाकडून पुजारी महिलेला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 13:45 IST2024-12-09T13:45:36+5:302024-12-09T13:45:57+5:30
गडहिंग्लज : ‘मी ज्योतिषी आहे, सांगतो त्याप्रमाणे करा, तुमचे चांगले होईल’, अशी बतावणी करून येथील मारुती मंदिराच्या महिला पुजारीच्या ...

Kolhapur: ‘मी सांगतो त्याप्रमाणे करा, तुमचे चांगले होईल’; भामट्या ज्योतिषाकडून पुजारी महिलेला गंडा
गडहिंग्लज : ‘मी ज्योतिषी आहे, सांगतो त्याप्रमाणे करा, तुमचे चांगले होईल’, अशी बतावणी करून येथील मारुती मंदिराच्या महिला पुजारीच्या ६५ हजाराच्या दागिन्यावर भामट्या ज्योतिषाने डल्ला मारला. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (दि.८) शहरातील गजबजलेल्या नेहरू चौकातील मारुती मंदिरात ही घटना घडली.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, येथील नेहरू चौकातील मारुती मंदिरातील पूजा-अर्चा चंद्रकांत गुरव यांच्याकडे आहे. त्यांच्या पत्नी विजया या रविवारी सकाळी मंदिरात पूजा करीत होत्या. दरम्यान, मंदिरात आलेल्या ज्योतिषाने आपल्याजवळील काही रक्कम मंदिरातील टेबलावर दक्षिणा म्हणून ठेवली. ‘आपण ज्योतिषी आहोत, तुमच्या गळ्यातील सोन्याची चेन व अंगठी काढून ठेवा, तुमचे चांगले होईल’, असे त्याने विजया यांना सांगितले.
चेन व अंगठी त्याने पैशात गुंडाळून आपल्याकडील प्लास्टिकच्या कॅरीबॅगेमध्ये घालून विजया यांच्या हातात दिली व तो ज्योतिषी मंदिरातून निघून गेला. त्यानंतर विजया यांनी कॅरीबॅगेत पाहिले असता त्यात चेन व अंगठी नसल्याचे आढळून आले. विजया गुरव यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
‘देवा’समोरच गेले दागिने
नेहरू चौकातील मारुती मंदिराची नित्य पूजा चंद्रकांत गुरव यांच्याकडे आहे. त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील एक तोळ्याची चेन आणि ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी भामट्या ज्योतिषाने हातचलाखीने मंदिरातील पूजेच्यावेळीच लांबवली. भर वस्तीतील मंदिरात देवासमोरच झालेल्या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.