प्रधानमंत्री गरीब कल्याणचे पैसे पोस्टामार्फत द्यायला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 12:52 PM2020-04-15T12:52:36+5:302020-04-15T12:53:45+5:30
जिल्ह्यात एकूण ५३५ पोस्ट कार्यालय कार्यरत असून, त्यापैकी ४३९ ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत. या ग्रामीण पोस्ट कार्यालयामधून ६७४ प्रशिक्षित ग्रामीण डाकसेवक रक्कम अदा करण्यासाठी कार्यरत आहेत.
कोल्हापूर : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून आलेले पैसे जनधन खात्यावर जमा झाले आहेत. हे पैसे पोस्ट शाखेमधून तसेच ग्रामीण डाक सेवकाच्या माध्यमातून मिळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत ९ एप्रिल रोजी आदेश दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
बचत खाते आधार क्रमांकाशी जोडलेली आहे.
अशा खात्यावरील रक्कम बायोमेट्रीक यंत्राद्वारे पोस्ट कार्यालय किंवा ग्रामीण डाक सेवकाच्या माध्यमातून मिळणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता सर्व बँकातील खातेधारक ज्यांच्या खात्याला आधार क्रमांक जोडलेला आहे, असे लाभार्थी पोस्ट कार्यालयामधून पैसे काढू शकतील. या प्रकारचे पैसे काढण्याची मर्र्यादा प्रतिदिन रुपये दहा हजार रुपये असणार आहे.
जिल्ह्यात एकूण ५३५ पोस्ट कार्यालय कार्यरत असून, त्यापैकी ४३९ ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत. या ग्रामीण पोस्ट कार्यालयामधून ६७४ प्रशिक्षित ग्रामीण डाकसेवक रक्कम अदा करण्यासाठी कार्यरत आहेत. आधार क्रमांकाशी जोडलेल्या कुठल्याही बँकेच्या बचत खात्यावरील व्यवहार या ग्रामीण डाक सेवकांकडून करता येणार आहेत. पोस्ट कार्यालयातर्फे या सुविधा, सध्या उपलब्ध असलेल्या बँक शाखा, एटीएम, व्यवसाय समन्वयक, ग्राहक सेवा केंद्र व्यतिरिक्त राहतील.
अफवांवर विश्वास ठेवू नये: जिल्हा अग्रणी बॅँक व्यवस्थापक
कोणत्याही प्रकारे बँक शाखांमध्ये होणारी गर्दी टाळावी. आपली रक्कम बँक खात्यामध्ये सुरक्षित असून कोणताही लाभ परत जाणार नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हा अग्रणी बॅँक व्यवस्थापक राहुल माने यांनी केले आहे.