‘प्रधानमंत्री सूर्यघर’ लाही बिलाचा शॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 06:05 IST2025-02-23T06:05:31+5:302025-02-23T06:05:43+5:30
राज्यातील एक लाखांवर वीजग्राहक घराच्या छतावर सौरऊर्जानिर्मिती पॅनल्स बसवून वीज निर्माण करत आहेत. घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य येत आहे.

‘प्रधानमंत्री सूर्यघर’ लाही बिलाचा शॉक
- भीमगोंडा देसाई
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतील ग्राहकांनाही वीजबिल आकारण्यात येणार आहे. यातील ग्राहकांना संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ यावेळेत वापरलेल्या विजेवर बिल आकारावे, असा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दिला आहे.
राज्यातील एक लाखांवर वीजग्राहक घराच्या छतावर सौरऊर्जानिर्मिती पॅनल्स बसवून वीज निर्माण करत आहेत. घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य येत आहे.
अतिरिक्त वीज महावितरणला पाठवून उत्पन्नही मिळत आहे. पॅनल्स बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन किलोवॅटला ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. असे असताना दिलेला हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कर्ज काढून घरावर सौरऊर्जानिर्मिती पॅनल्स बसविलेल्यांना बँकेचा हप्ता आणि वीजबिल, असा दुहेरी झटका ग्राहकांना बसणार आहे.
महावितरणने सूर्यघर योजनेतील ग्राहकांना बिलाची आकारणी केली, तर मूळ उद्देशाला धक्का लागणार आहे. बिल भरायचे असेल तर कर्ज काढून सौरऊर्जा पॅनल्स का बसवायचे, असा प्रश्न ग्राहकांंना पडत आहे. ग्राहकांनी पाठ फिरवली तर सौरऊर्जेसंबंधीच्या उद्योगांना जबर फटका बसणार आहे. - नितीन कुलकर्णी, संचालक, महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर असोसिएशन, कोल्हापूर