प्रधानमंत्री शिष्यवृत्तीस १४ डिसेंबरपर्यंत वाढ
By admin | Published: December 3, 2015 12:55 AM2015-12-03T00:55:28+5:302015-12-03T01:15:41+5:30
अर्ज कमी : माजी सैनिकांच्या मुलांना फायदा
कोल्हापूर : माजी सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वर्षाला दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजने’ला १४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नोव्हेंबरअखेर अर्ज जमा करून ते द्यायचे होते; परंतु अर्जांची संख्या कमी असल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून मुलांना वर्षाला २४ हजार रुपये, तर मुलींना २७ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला माजी सैनिकांना पाल्यांसाठी अर्ज करण्याबाबत कळविण्यात आले. याची मुदत नोव्हेंबर महिनाअखेर होती; परंतु महिनाअखेर अवघे ३० अर्जच आल्याने १४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत देशभरातील चार हजार माजी सैनिकांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. गतवर्षी जिल्ह्यातून ५४ पात्र अर्ज पाठविण्यात आले होते. त्यांपैकी फक्त आठजणांनाच ही शिष्यवृत्ती मिळाली.