बहुजनांचा ज्ञानस्रोत ‘प्रिन्स शिवाजी बोर्डिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 01:05 AM2019-04-15T01:05:28+5:302019-04-15T01:05:34+5:30

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे सुपुत्र प्रिन्स शिवाजी यांच्या चिरस्मृतिप्रीत्यर्थ ...

'Prince Shivaji Boarding' | बहुजनांचा ज्ञानस्रोत ‘प्रिन्स शिवाजी बोर्डिंग’

बहुजनांचा ज्ञानस्रोत ‘प्रिन्स शिवाजी बोर्डिंग’

googlenewsNext

संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे सुपुत्र प्रिन्स शिवाजी यांच्या चिरस्मृतिप्रीत्यर्थ बहुजन समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी स्थापन केलेली ‘श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस’ ही संस्था शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन ही संस्था कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. राज्य शासनाने सन २००३ मध्ये ‘आदर्श शिक्षण संस्था’ पुरस्काराने संस्थेला सन्मानित केले आहे.
राजर्षी शाहूंनी दि. १ जुलै १९२० रोजी संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या नावात ‘मराठा बोर्डिंग हाऊस’ असे शब्द असले, तरीही सुरुवातीपासून या वसतिगृहात सर्वच जातिधर्मांची मुले-मुली प्रवेश घेत आली आहेत. बापूराव शिंदे यांच्या पुणे येथील ‘फ्री बोर्डिंग’च्या कार्यावरून राजर्षी शाहूंच्या मनात त्या पद्धतीचे बोर्डिंग कोल्हापुरात स्थापन करण्याची कल्पना होती. त्यानुसार त्यांनी श्रीपतराव शिंदे यांना कोल्हापुरात असे बोर्डिंग सुरू करण्याबाबत पुढाकार घेण्याची आज्ञा दिली. शिंदे यांनी कोल्हापूरमधील रावसाहेब सरदेसाई, श्रीपतराव मंडलिक, बाळासाहेब गायकवाड, कृष्णराव साळोखे, अ‍ॅड. खंडेराव बागल, गोविंदराव शिंदे, चंद्रोबा नरके, शंकरराव साळोखे, बाबूराव यादव, बाबूराव सासने, सुबराव निकम, रामचंद्र (दासराम) जाधव, व्ही. जी. चव्हाण, मामासाहेब मिणचेकर, पुण्यातील बाबूराव जगताप, आदींच्या सक्रिय योगदानासह काम करून बोर्डिंगची स्थापना केली; त्यासाठी हिंदुराव घाटगे, हौसाबाई जाधव, आण्णासाहेब मोरे, आदींचे विशेष योगदान लाभले.
बोर्डिंगचा प्रारंभ अवघ्या सात विद्यार्थ्यांसह झाला. सुरुवातीला ही मुले घरोघरी जाऊन भाजीभाकरीची भिक्षा गोळा करत होती. त्यानंतर बोर्डिंगच्या चालकांनी कोल्हापुरातील विविध सात पेठांतील प्रमुखांना भेटून त्या ठिकाणी या सात विद्यार्थ्यांच्या जेवणाची वाराने सोय केली. पुढे विद्यार्थ्यांबरोबर त्यांना जेवणाचा वार देणाऱ्या लोकांची संख्या वाढली. राजर्षी शाहूंनी पुढे बोर्डिंगला जागा, इमारती, जमिनीचे उत्पन्न, आदी देऊन बळ दिले. सन १९४८ मध्ये विद्यार्थ्यांना जेवणासाठी वार लावण्याची पद्धत बंद करून, बोर्डिंगमध्ये सर्व मुलांच्या जेवणाची व्यवस्था केली. सन १९५९ मध्ये मुलींचे वसतिगृह सुरूकेले. त्या ठिकाणी विविध जातिधर्मांच्या मुलींना प्रवेश दिला जात होता. या वसतिगृहाची पहिली विद्यार्थिनी म्हणून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या धर्मपत्नी कुसुमताई यांनी प्रवेश घेतला होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज आणि श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज हे या संस्थेचे चीफ पेट्रन होते.
प्रारंभी वसतिगृह म्हणून सुरूकेलेल्या शिक्षण संस्थेने शिक्षण देण्याचे काम सन १९६० मध्ये सुरू केले. आजघडीला तीन वसतिगृह आणि नऊ शैक्षणिक शाखा कार्यरत आहेत. त्यात शिवाजी पेठेतील मुलांचे वसतिगृह, मुलींची तीन वसतिगृहे, मंगळवार पेठेतील छत्रपती राजाराम विद्यार्थी वसतिगृह, महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (स्थापना १९६०), न्यू कॉलेज (१९७१), देवाळे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज (१९७६), न्यू पॉलिटेक्निक उचगाव (१९८३), कॉलेज आॅफ आर्किटेक्चर (१९८४), न्यू प्राथमिक विद्यालय (१९८५), गर्ल्स हायस्कूल (१९९१), न्यू माध्यमिक विद्यालय उचगाव (२०००) आणि प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल (२००८) यांचा समावेश आहे. शाहू छत्रपती हे या संस्थेचे चीफ पेट्रन आहेत.
संस्थेचे ध्येय, उद्देश
बहुजन समाजात शिक्षण प्रसार करणे. विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्राथमिक ते महाविद्यालयीन आणि तांत्रिक शिक्षण देणे. शिक्षण, भोजन, निवास, आदी सोयी मोफत अगर अल्प खर्चात पुरविणे. आजी-माजी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कर्जाऊ शिष्यवृत्त्या देणे. स्वावलंबन, स्वाभिमान, समाजसेवा यांची जोपासना करणे, आदी संस्थेची ध्येये आणि उद्देश आहे. सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक, सर्व बिलांचे पेमेंट क्रॉस्ड चेकद्वारे केले जाते. शासकीय, विद्यापीठीय नियमांनुसार समित्यांद्वारे गुणवत्तेवर आधारित नोकरभरती केली जाते. गुणवत्तेच्या निकषावर विविध शाखांमध्ये प्रवेश दिला जातो. शैक्षणिक शाखांमार्फत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे ही संस्थेची वैशिष्ट्ये आहेत.
विद्यमान कार्यकारिणी
शामराव चरापले (अध्यक्ष), कुसुमताई नागनाथ नायकवडी, बी. जी. बोराडे (उपाध्यक्ष), डी. बी. पाटील (चेअरमन), आर. डी. पाटील (व्हाईस चेअरमन), दत्तात्रय इंगवले (सेक्रेटरी), राजाराम आतकिरे (खजानीस), किसन पाटील, आत्माराम पाटील, स्वाती निगडे, विलासराव मोरे, दिनकर किल्लेदार, यशवंत चव्हाण, आप्पासो वणिरे, रघुनाथ खोडवे, प्रल्हाद पाटील, यशवंत खाडे, विनय पाटील, चंद्रकांत गोडसे, सई खराडे, अरुणा नलवडे, डॉ. पांडुरंग पाटील (सदस्य).

अनेक पिढ्या घडविणारे बोर्डिंग
शाहू महाराज यांनी दि. १८ एप्रिल १९०१ मध्ये ‘व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग’ची स्थापना केली. त्यामध्ये मराठा समाजातील ग्रामीण भागातील प्रतिष्ठित घराण्यांतील मुले शिकत होती. या बोर्डिंगची विद्यार्थी क्षमता मर्यादित होती; त्यामुळे गरीब मराठा अथवा तत्सम समाजातील सर्वच मुलांना तेथे प्रवेश मिळणे अवघड होते. ते लक्षात घेऊन ‘प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग’ची स्थापना झाली. या बोर्डिंगने बहुजन समाजातील अनेक पिढ्या घडविल्या आहेत. बोर्डिंगच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये बाळासाहेब देसाई, डी. एस. खांडेकर, पी. टी. पाटील, टी. के. शेंडगे, एन. डी. निकम, बापूजी साळुंखे, नागनाथअण्णा नायकवडी, पी. बी. पाटील, दत्ताजीराव साळोखे, दत्ता देशमुख, गोविंद पानसरे, रा. कृ. कणबरकर, नारायण वारके, चंद्रकुमार नलगे, डी. बी. पाटील, आदी कर्तबगार मान्यवरांचा समावेश आहे. लाखो गरीब, सामान्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ देऊन त्यांना घडविण्याचे काम या बोर्डिंगच्या माध्यमातून झाले.
‘बहुजनपर्व’मध्ये समग्र इतिहास
या शैक्षणिक संकुलाचा इतिहास ‘बहुजनपर्व’या ग्रंथातून उलघडला आहे. त्यामध्ये १९२० पासून या संस्थेच्या इतिहासाचा मसुदा ए. जी. वणिरे, त्यांचे सहकारी सी. एम. गायकवाड आणि संस्थेतील सात सदस्यीय इतिहास चिकित्सा समितीने तीन वर्षे काम करून ७०० पानांचे ‘बहुजनपर्व’ साकारले; त्यासाठी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रस्तावना लाभली आहे.

Web Title: 'Prince Shivaji Boarding'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.