Kolhapur: शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी तीन हजारांची लाच; मुख्याध्यापकास अटक

By उद्धव गोडसे | Updated: April 17, 2025 11:40 IST2025-04-17T11:38:49+5:302025-04-17T11:40:12+5:30

महापालिकेच्या शेलाजी वन्नाजी विद्यालयात कारवाई

Principal arrested while accepting a bribe of Rs 3000 to issue a school leaving certificate in kolhapur | Kolhapur: शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी तीन हजारांची लाच; मुख्याध्यापकास अटक

Kolhapur: शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी तीन हजारांची लाच; मुख्याध्यापकास अटक

कोल्हापूर : शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणारा महापालिकेच्या शेलाजी वन्नाजी विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापक संजय जयसिंग नार्वेकर (वय ५२) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. ही कारवाई आज, गुरुवारी (दि. १७) सकाळी लक्ष्मीपुरी येथील शाळेत झाली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारास जातीचा दाखला काढायचा होता. त्यासाठी वडील आणि पाच चुलत्यांचे शाळा सोडल्याचे दाखले मिळावेत, अशी मागणी त्यांनी शेलाजी वन्नाजी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे केली होती. सहा दाखले देण्यासाठी प्रभारी मुख्याध्यापक संजय नार्वेकर याने तीन हजार रुपयांची मागणी केली. 

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेऊन तक्रार दिली. मुख्याध्यापक नार्वेकर याने लाच मागितल्याचे स्पष्ट होताच अधिका-यांनी गुरुवारी सकाळी शाळेत सापळा रचला. त्यावेळी नार्वेकर तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडला. 

नार्वेकर याला अटक केली असून, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्याच्या घराची झडती घेतली जात असल्याची माहिती अधिका-यांनी दिली. शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी मुख्याध्यापकाने लाच स्वीकारल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Web Title: Principal arrested while accepting a bribe of Rs 3000 to issue a school leaving certificate in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.