Kolhapur: मुख्याध्यापकाकडून मुलाशी अनैसर्गिक कृत्य, आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 11:47 IST2024-12-17T11:46:18+5:302024-12-17T11:47:16+5:30

कसून चौकशी

Principal of Residential Academy at Kasba Beed in Kolhapur Unnatural act with minor | Kolhapur: मुख्याध्यापकाकडून मुलाशी अनैसर्गिक कृत्य, आरोपीस अटक

Kolhapur: मुख्याध्यापकाकडून मुलाशी अनैसर्गिक कृत्य, आरोपीस अटक

कोल्हापूर : शिष्यवृत्ती परीक्षा आणि केंद्रीय शाळा प्रवेश परीक्षांची तयारी करवून घेणाऱ्या कसबा बीड (ता. करवीर) येथील यु. व्ही. निवासी ॲकॅडमीच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले. हा धक्कादायक प्रकार ८ डिसेंबरला घडला असून, पीडित मुलाच्या पालकांनी शनिवारी (दि. १५) रात्री करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मुख्याध्यापक प्रदीप कृष्णात नलवडे (वय ३३, मूळ रा. धामोड, ता. राधानगरी, सध्या रा. कसबा बीड) याला अटक केली.

करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा बीड येथील बीडशेड फाटा येथे यु. व्ही. ॲकॅडमी आहे. या ॲकॅडमीत ९४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील २३ मुलगे आणि ६ मुली निवासी आहेत. ८ डिसेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास ॲकॅडमीतील मुख्याध्यापक प्रदीप नलवडे हा दुसऱ्या मजल्यावरील अभ्यासिकेत मुलांसोबत झोपला होता. त्यावेळी त्याने एका अल्पवयीन मुलाला त्याच्याकडे बोलावून घेऊन अनैसर्गिक कृत्य केले.

घाबरलेल्या मुलाने हा प्रकार आठवड्याने घरात सांगितला. त्यानंतर वडिलांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने मुख्याध्यापकास अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला बुधवारपर्यंत (दि. १८) पोलिस कोठडी मिळाली. उपनिरीक्षक नाथा गळवे अधिक तपास करीत आहेत.

कसून चौकशी

पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी मुख्याध्यापक नलवडे याची कसून चौकशी केली. तोच ॲकॅडमीचा प्रमुख आहे. त्याने आणखी काही विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केले आहे काय? याचाही शोध सुरू आहे. मुलांना विश्वासात घेऊन माहिती काढली जात असल्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले. या ॲकॅडमीत दोन महिला शिक्षिका आणि तीन शिक्षक काम करतात. यातील दोन शिक्षक निवासी असतात.

गंभीर प्रकाराने खळबळ

जिल्ह्यात अनेक ॲकॅडमी असून, यात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालक विश्वासाने मुलांना ॲकॅडमीत पाठवतात. मात्र, शिक्षकांकडूनच त्यांचे लैंगिक शोषण होत असेल तर हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.

Web Title: Principal of Residential Academy at Kasba Beed in Kolhapur Unnatural act with minor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.