मुख्याध्यापकांची अर्धनग्नावस्थेत धिंड

By Admin | Published: June 16, 2015 01:25 AM2015-06-16T01:25:40+5:302015-06-16T01:25:40+5:30

महाबळेश्वरमध्ये तणाव : शाळेत महापुरुषाच्या फोटोची विटंबना झाल्याचा आरोप

Principal of the Principal | मुख्याध्यापकांची अर्धनग्नावस्थेत धिंड

मुख्याध्यापकांची अर्धनग्नावस्थेत धिंड

googlenewsNext

महाबळेश्वर : येथील पालिकेच्या प्राथमिक शाळेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो बंद कपाटात ठेवल्याच्या कारणावरून काही राजकीय कार्यकर्त्यांनी दोन मुख्याध्यापकांना शाई फासली. त्यानंतर कपडे फाडून त्यांची भर बाजारपेठेतून धिंड काढत पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच शहरातील अनेक शिक्षकांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी दोन्ही बाजूंच्या तक्रारी घेण्याचे काम महाबळेश्वर पोलीस ठाण्यात सुरू होते. दरम्यान, रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार शिंदे यांच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक व प्राथमिक शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापक संजय ओंबळे यांच्या कार्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो खराब झाल्याने कपाटात ठेवण्यात आला होता.
ही बाब समजल्यानंतर सोमवारी दुपारी काहीजण खात्री करण्यासाठी शाळेत गेले. त्यांनी जातानाच शाईची बाटली सोबत घेतली होती. मुख्याध्यापकांच्या तोंडाला शाई फासून कार्यकर्ते त्याच इमारतीतील शाळा क्रमांक दोनमध्ये गेले. या ठिकाणी फोटोला काचेचे आवरण नसल्याने तेथील मुख्याध्यापक जनार्दन कदम यांच्याही तोंडाला शाई फासली. संतप्त जमावाने दोघांना मारहाण करत एका गाडीत कोंबून पालिकेत नेले. विटंबनेला जबाबदार धरून दोन्ही मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी करत पालिकेत ठिय्या आंदोलन सुरू झाले. त्यानंतरदोघांनाही नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांच्या कार्यालयात आणले. तेथे नगरसेवक कुमार शिंदे, मुख्याधिकारी अधिकारी सचिन पवार, उपनगराध्यक्ष संतोष आखाडे, नगरसेवक संदीप साळुंखे, नगरसेविका सुरेखा आखाडे यांचे पती प्रशांत आखाडे, प्रशासन अधिकारी व्ही. एस. फडतरे यांच्यासह पंधरा ते वीस कार्यकर्ते उपस्थित होते.
घटनेची माहिती समजताच शिक्षक व राजकीय कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमले. त्यामुळे बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी जमलेल्या शिक्षकांनी या प्रकाराचा निषेध केला.
तर याच ठिकाणी कुमार शिंदे व त्यांचे बंधू योगेश शिंदे यांनी ठिय्या मांडला. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात सुरू होते. (प्रतिनिधी)


कुमार शिंदेंसह दहाजणांवर गुन्हा
महाबळेश्वरमधील दोन मुख्याध्यापकांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक कुमार शिंदे त्यांचे बंधू योगेश शिंदेसह दहा जणांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला.


दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी
पालिकेत दोन्ही शिक्षकांना मारहाण केली. यावेळी शिक्षक गयावया करत होते. त्यांना वाचविण्यासाठी कोणीही आले नाही. यावेळी दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. याप्रकरणी तपास करण्यासाठी नगराध्यक्षा तोष्णीवाल यांनी पाच जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही राजकीय नेत्यांचे समाधान न झाल्याने दोन्ही मुख्याध्यापकांची कपडे फाडून भरबाजारपेठेतून पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली.

यामध्ये बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणणे, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्यावर भादंविसं १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ३५३, ३३२ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक सावंत तपास करत आहेत. रात्री उशिरा दंगापथक दाखल झाले.

Web Title: Principal of the Principal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.