गुटखा कारखान्यावर छापा
By admin | Published: September 16, 2015 01:15 AM2015-09-16T01:15:12+5:302015-09-16T01:15:12+5:30
कोंडिग्रेत कारवाई : दहाजणांना अटक; मशिनरीसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
जयसिंगपूर : कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथे गुटखा निर्मिती कारखान्यावर जयसिंगपूर पोलिसांनी छापा टाकून दोन मशिनरीसह ६ लाख १३ हजार २७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी दहाजणांना अटक करण्यात आली आहे.
मुख्य सूत्रधार विलास नागेश जमदाडे (वय ३९, रा. हरिपूर, सांगली), कुमार बापू कचरे (४०, रा. कोंडिग्रे) यांच्यासह गोविंद बाबूराव कुबडगी (३०, रा. हरिपूर), मुकेश नथुराम कडवा (२०), गणेश रामेश्वर भानावत (१९), विष्णू सुरेश भानावत (१९), पूनाराम सोनलाल गोरण (२२), रामनिवास लक्ष्मण गोरण (३२, सर्व रा. राजस्थान), राजसिंग छोटेलाल अनुरागी (२२, रा. उत्तर प्रदेश) व हुसेन कुतबुद्दीन कोतवाल (२४, रा. निमशिरगाव) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कोंडिग्रे येथील मंगलनगरमध्ये पिंटू कोळेकर याच्या घरात गुटखा तयार केला जातो याची पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता, गुटखा मिक्सर व पॅकिंग मशिनरी दिसून आली. याठिकाणी पोलिसांना गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळून आला. दरम्यान, जप्त केलेला मुद्देमाल रात्री टेम्पोमधून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. संशयितांचे मोबाईल व मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या. संशयित हे सराईत असून कर्नाटकातून कच्चा माल आणण्यात आला आहे. महिन्याभरापासून येथे गुटखा कारखाना सुरू होता. (प्रतिनिधी)