गुटखा कारखाना छापा; दीड कोटीचा माल जप्त
By admin | Published: September 16, 2014 10:38 PM2014-09-16T22:38:38+5:302014-09-16T23:25:44+5:30
गुटखा कारखाना छापा; दीड कोटीचा माल जप्त
इचलकरंजी : येथील जुन्या चंदूर रोडवर असलेल्या सुगंधी सुपारी, पानमसाला व गुटखा कारखान्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अठरा लाख ६५ हजार, तर संशयितांच्या बंगल्यावर व गोडाऊनवर छापे टाकून एक कोटी २८ लाख ३८ हजार असा एकूण एक कोटी ४७ लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राजू लक्ष्मण पाचापुरे व अमित मिणचे अशी दोघा संशयितांची नावे आहेत. या छाप्यांमध्ये पोलिसांनी आठ लाख रुपयांच्या चार मशिनरी, सात लाख २० हजार रुपये किमतीची चार वाहने, यामध्ये ओमनी व्हॅन (एमएच ०९ बीएक्स ०२०६), मारुती कंपनीची मोटार (एमएच ०९ सीएल ०२४४) व महिंद्रा मॅक्सी आणि अॅक्टिव्हा मोपेड (विनानंबर प्लेट) जप्त केली आहे. या कारवाईत मावा, गुटखा, पानमसाला व सुगंधी सुपारी यांची ४१ पोती, तयार गुटखा १३६ पुडे, तयार माल (मावा) पाच पोती, ५४ पॅकिंग रोल, वीस पोती पाऊच असा माल मिळून आला आहे, तर बालाजीनगर येथे मिणचे व पाचापुरे यांच्या कारखान्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये व बंगल्यांमध्ये टाकलेल्या छाप्यात सुगंधी सुपारीची ११४ पोती, २७ डबे चुना पावडर, आर्यन नाव छापलेले पाऊच, तंबाखूजन्य पावडरची ६२ पोती, अनब्रॅण्डेड पाऊचची दहा पोती, आर्यन सुपारी पाऊचची दोन पोती, आर्यन मावा पाऊच तीस पोती, एक हजार किलो तपकिरी रंगाची तंबाखू पावडर, पाऊच पॅकिंग मशीन, पावडर दळण्याचे मशीन, ट्रे, तंबाखूचे पातळ द्रव्य असलेल्या पत्र्याचे ४० डबे, पाऊच पॅकिंग रोलची शंभर पोती, पॅकिंग ठेवण्यासाठी लागणारी २२ पोती व तयार खुल्या स्वरूपात ठेवलेल्या ७० किलो गुटख्याच्या सहा पिशव्या असा एक कोटी २८ लाख ३८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.
मुख्य संशयित आरोपी फरार असल्यामुळे नेमकी या कारखान्यात कितीजणांची भागीदारी आहे, किती कामगार काम करतात, यासह अन्य बाबी स्पष्ट झाल्या नाहीत. तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज खाडे करीत आहेत. (प्रतिनिधी)
पोलिसाची भागीदारी असल्याची चर्चा
कारवाई केलेल्या या गुटखा कारखान्यात पोलीस खात्यातील एका कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याची चर्चा दबक्या आवाजात पोलीस वर्तुळात सुरू आहे. ‘त्या’ पोलिसामुळेच या कारवाईची माहिती संबंधितांना समजली. त्यामुळे गुटख्याची वाहतूक करणारी दोन्ही वाहने घटनास्थळावर सोडून चालक फरार झाला, तर अखंड कारखाना बंद करून चालक, कर्मचारी गायब झाले. त्यामुळे एवढ्या मोठ्या या कारवाईत अद्याप कोणालाही अटक झाली नाही.
खबऱ्याच म्होरक्या
गेल्या काही दिवसांपासून शहरात पोलिसांनी गुटखा, पानमसाला व सुगंधी सुपारी यावर कारवाईचा सपाटा लावला आहे. वाहतूक करणारी वाहने, गोडावून, विक्रीसाठी ठेवलेल्या घरांमध्येही पोलिसांनी कारवाई केली. या कारवाया करण्यासाठी माहिती देणारा पोलिसांचा खबऱ्याच या प्रकरणात म्होरक्या (मुख्य संशयित आरोपी) बनला आहे. अन्य गटांची माहिती पोलिसांना देऊन त्यांच्यावर कारवाई करायला लावणे, असे कारनामे करून स्वत:चा गुटखा व्यवसाय तेजीत चालविणारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.