इचलकरंजीत पानमसाला कारखान्यावर छापा
By admin | Published: September 15, 2014 11:38 PM2014-09-15T23:38:34+5:302014-09-15T23:47:07+5:30
लाखोंचा मुद्देमाल जप्त : पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
इचलकरंजी : ‘आर्यन’ नावाने पानमसाला तयार करणाऱ्या कारखान्यावर सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांचे पथक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने आज, सोमवारी छापा टाकून चार मशिनरी, दोन वाहने व सुमारे ७० पोती पानमसाला, असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवायांमध्ये पुढे आलेल्या माहितीवरून पोलिसांनी आज ही कारवाई केली.
शहरात गेल्या काही दिवसांपासून सुगंधी सुपारी साठा करणारे व वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस व अन्न प्रशासन विभागाने कारवाया केल्या. यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला. त्यानंतर शहर परिसरातच ही सुपारी तयार होत असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार तपास करत असताना आज चैतन्य यांच्या पथकाला या अनधिकृत कारखान्याचा सुगावा लागला. त्याप्रमाणे आज पोलिसांच्या पथकाने पाळत ठेवून थोरात चौकात सुगंधी सुपारीने खचाखच भरलेली बोलेरो मोटार व टेम्पो जप्त केला. या कारवाईची माहिती लागताच चालक गाड्या सोडून पसार झाला. दोन्ही वाहनांतून २५ पोती सुगंधी पानमसाला जप्त करून वाहने ताब्यात घेण्यात आली.
त्यानंतर ‘आर्यन’ नावाची सुगंधी सुपारी व पानमसाला तयार करणारा कारखाना जुन्या चंदूर रोडवरील दुर्गामाता मंदिर परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अन्न प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह या कारखान्यावर धाड टाकली. कारखाना बंद असल्याने पंचनामा करून पोलिसांनी कुलूप तोडून कारवाई केली. कारखान्यात सुगंधी सुपारी, तंबाखू, लाकडाचा भुसा, रिकाम्या पुड्या, चार मशिनरी यासह पानमसाला व सुगंधी सुपारी तयार करण्यासाठी लागणारे इतर साहित्य, तसेच सुमारे ५० पोती तयार पानमसाला जप्त करण्यात आला. पोलिसांनी हा कारखाना सील केला असून, पंचनामा करून कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
हा कारखाना राजू पाचापुरे चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. येथे तयार होणारा पानमसाला शहरासह परिसरात व कर्नाटक सीमाभागात पाठविण्यात येत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. (प्रतिनिधी)