इस्लामपूर येथील वारणा हॉस्पिटलवर छापा
By Admin | Published: November 4, 2014 01:02 AM2014-11-04T01:02:28+5:302014-11-04T01:03:40+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तपासणी
इस्लामपूर : शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील डॉ. राम कुलकर्णी यांच्या वारणा हॉस्पिटल शाखा क्रमांक दोनवर आज, सोमवारी जिल्हा प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. तेथील गर्भलिंग चाचणी व गर्भपातासंबंधीच्या कागदपत्रांची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तपासणी करण्यात आली. दिवसभराच्या तपासणीनंतर
पथकाने काही आक्षेपार्ह कागदपत्रांसह रुग्ण तपासणीचे दप्तर ताब्यात घेतले.
आज सकाळी पावणेबाराच्या सुमारास प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान व चिकित्सा समितीच्या सांगली जिल्ह्याच्या कायदे सल्लागार
अॅड. अर्चना उबाळे यांच्यासह तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्या पथकाने छापा टाकला.
प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान व चिकित्सा करण्यासह गर्भपात
केल्यासंबंधीच्या नोंदींचा अहवाल या कायद्यांतर्गत असणाऱ्या जिल्हास्तरीय समितीकडे जात असतो. वारणा हॉस्पिटलमधील यासंबंधीच्या कामकाजाची छाननी केल्यानंतर शहर व परिसरातील इतर सोनोग्राफी केंद्रांपेक्षा वारणा हॉस्पिटलमध्ये तुलनेने जास्त गर्भलिंग चाचणी व गर्भपात होत असल्याचे निदर्शनास आल्यावर जिल्हास्तरीय समितीचे प्रमुख जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी या हॉस्पिटलच्या दप्तर तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार अॅड. उबाळे, तहसीलदार सरनोबत यांच्या पथकाने ही तपासणी केली.
गेल्या तीन महिन्यांतील सुमारे ५०० रुग्णांच्या तपासणी कागदपत्रांची छाननी करण्याचे काम सुरू होते. दिवसभरात सुमारे शंभरावर केस पेपर या पथकाने तपासले. त्यातील काही आक्षेपार्ह कागदपत्रेही ताब्यात घेतल्याचे अॅड. उबाळे यांनी सांगितले. याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही अॅड. उबाळे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. (वार्ताहर)