बनावट नोटांची छपाई, तिघे ताब्यात, रॅकेटची शक्यता; कर्नाटक कनेक्शन उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 10:38 AM2020-10-06T10:38:11+5:302020-10-06T10:40:30+5:30
crimenews, kolhapur, karnataka, counterfeit notes बनावट नोटा प्रकरणाचा पर्दाफाश होण्याची शक्यता असून, त्याचे कनेक्शन कर्नाटक राज्यात दिसून येत आहे.
कुरुंदवाड : बनावट नोटाप्रकरणी शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, अकिवाट परिसरातील तिघांना कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बनावट नोटा, प्रिंटर मशीन, नोटा प्रिंट करणारे कागदांचे गठ्ठे जप्त केल्याची चर्चा शिरोळ तालुक्यात सुरू आहे. या वृत्तामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. बनावट नोटा प्रकरणाचा पर्दाफाश होण्याची शक्यता असून, त्याचे कनेक्शन कर्नाटक राज्यात दिसून येत आहे.
तपासासाठी पोलिसांचे पथक कर्नाटकात रवाना झाले आहे. खऱ्या नोटा घेऊन जादा बनावट नोटा देतो असे सांगून शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील एकाने टाकळी येथील एकाकडून तसेच खिद्रापुरातील दोघांकडून पैसे घेतले, पण आठवड्यानंतरही त्यांनी बनावट नोटा न दिल्याने तिघेही संभ्रमावस्थेत सापडले.
काही दिवस वाट पाहून तिघांनी त्याला बेदम मारहाण केली. खिद्रापूर येथील दोघांनी त्याच्या घरात जाऊन प्रिंटर, कागदपत्रे आणून आपल्या घरी ठेवले होते. या वादावादीची चर्चा गावभर पसरल्यानंतर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री प्रथम अकिवाट येथील एकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशीअंती खिद्रापुरातील दोघांना असे एकूण तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी खिद्रापुरातून संशयिताच्या घरातून कागदाचे बंडल असलेली दोन पोती व बॉक्स ताब्यात घेतले असून प्रिंटर, कागद यासह बनावट नोटा असे साहित्य जप्त केल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तिघांनाही पोलिसांनी खाक्या दाखविला. चौकशीत बनावट नोटा प्रकरणाचे मूळ कर्नाटकात असल्याची माहिती पुढे आली.
पोलीस याचा अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास करत आहेत. पोलिसांचे एक पथक तपासासाठी कर्नाटकात रवाना झाले आहे. बनावट नोटाप्रकरणी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगितले.
चार वर्षांच्या घटनेची पुनरावृत्ती
चार वर्षांपूर्वी शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथे बनावट नोटाप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन प्रिंटर, कटर मशीन व संशयास्पद पेपरसह काही साहित्य पोलिसांनी जप्त केले होते. आता पुन्हा शिरोळ तालुक्यातीलच तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुन्हा बनावट नोटांचे रॅकेट याच तालुक्यातून उघडकीस येण्याची शक्यता आहे.