अडचणींवर मार्ग काढून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:21 AM2021-03-20T04:21:49+5:302021-03-20T04:21:49+5:30

कोल्हापूर : आंबेओहोळ धरणग्रस्तांपैकी ३८९ जणांचे पुनर्वसन आणि ५० कोटींचे वाटप झाले आहे. ३३ हेक्टर जमिनींवर आयुक्तांची स्थगिती असून, ...

Prioritize rehabilitation of project victims by finding a way out of difficulties | अडचणींवर मार्ग काढून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला प्राधान्य

अडचणींवर मार्ग काढून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला प्राधान्य

Next

कोल्हापूर : आंबेओहोळ धरणग्रस्तांपैकी ३८९ जणांचे पुनर्वसन आणि ५० कोटींचे वाटप झाले आहे. ३३ हेक्टर जमिनींवर आयुक्तांची स्थगिती असून, ती उठवण्यात येईल. त्याशिवाय अजून १६ हेक्टर जमीन उपलब्ध आहे. गडहिंग्लज, बेकनाळ येथील भूसंपादन, नागरिकांच्या वैयक्तिक, कौटुंबिक व न्यायालयीन अडचणी आहेत, त्यावर पर्याय काढून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास प्राधान्य देऊ, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिले.

आंबेओहोळ धरणाच्या घळभरणीचे काम सुरू असून, पुनर्वसन झाल्याशिवाय घळभरणी करू देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, भूसंपादन अधिकारी हेमंत निकम उपस्थित होते. यावेळी ४४ अर्जांवर चर्चा होऊन काही अर्ज निकाली काढण्यात आले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘चिकोत्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले. आता आंबेओहोळच्या नागरिकांचे वैयक्तिक, कौटुंबिक अडचणी आहेत, तांत्रिक मुद्दे आहेत, शासकीय नियमावली आहे, काही न्यायालयीन प्रकरणे आहेत, त्या सगळ्यांवर पर्याय काढून शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही.’

प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी प्रकरणाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांसाठी बुधवारचा दिवस राखीव ठेवला आहे. यादिवशी नागरिकांनी आपले अर्ज व त्यासंबंधीची कागदपत्रे घेऊन यावे, त्या प्रश्नावर समक्ष चर्चा करून त्यावर निर्णय घेतले जातील, असे सांगितले.

श्रमिक मुक्ती दलाचे संपत देसाई म्हणाले, ‘पुनर्वसन-संपादनाच्या संकलन यादीत प्रकल्पग्रस्ताच्या कुटुंबातील सुना, नातवंडे यांना ग्राह्य धरण्यात आलेले नाही. त्यांचाही समावेश करण्यात यावा, ६५ टक्के रक्कम भरुन पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्यात यावी, संकलन दुरुस्ती हे विषय मार्गी लागावेत.’

यावेळी जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, संजय तरडेकर, शंकर पावले, बजरंग पुंडपळ, सचिन पावले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

आंदोलनाबाबत आठ दिवसांनी निर्णय

बैठकीनंतर संपत देसाई म्हणाले, ‘आज अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली असली तरी आम्ही पूर्ण समाधानी नाही. संकलन दुरुस्ती, कुटूंब व्याख्या, देय जमिनीबाबत स्पष्टता नाही, किती लोकांचे पुनर्वसन व्हायचे बाकी आहे, किती जमीन उपलब्ध आहे. किती संपादित करावी लागेल, हे माहीत नाही. पुढील आठ दिवसात यावर काय कार्यवाही केली जाते, हे बघून आंदाेलनाबाबतचा निर्णय घेऊ.’

---

एकूण प्रकल्पग्रस्त : १२००

पुनर्वसन झालेले : ८००

अंशत: पुनर्वसन झालेले : ३००

पुनर्वसन न झालेले : १००

---

फोटो नं १९०३२०२१-कोल-आंबेओहोळ बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आंबेओहोळ धरणग्रस्तांची बैठक झाली. यावेळी अश्विनी जिरंगे, महेश सुर्वे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, क्लेमेंट बेन, प्रांताधिकारी विजया पांगारकर उपस्थित होत्या.

--

Web Title: Prioritize rehabilitation of project victims by finding a way out of difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.