रागांच्या अभ्यासाला प्राधान्य --अंजली निगवेकर -- थेट संवाद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 11:41 PM2019-01-10T23:41:36+5:302019-01-10T23:44:23+5:30

डॉ. अंजली निगवेकर यांच्या रूपाने शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच एक अंध महिला संगीत व नाट्यशास्त्र विभागप्रमुख म्हणून मिळाल्या आहेत. विभागप्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्यांचे बालपण,

Priority to anger study - Anjali Nigavekar - Direct Dialogue ... | रागांच्या अभ्यासाला प्राधान्य --अंजली निगवेकर -- थेट संवाद...

रागांच्या अभ्यासाला प्राधान्य --अंजली निगवेकर -- थेट संवाद...

Next

डॉ. अंजली निगवेकर यांच्या रूपाने शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच एक अंध महिला संगीत व नाट्यशास्त्र विभागप्रमुख म्हणून मिळाल्या आहेत. विभागप्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्यांचे बालपण, संगीतातील कारकीर्द आणि भविष्यातील नियोजन याविषयी त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...

प्रश्न : आपल्या बालपणाविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल?
उत्तर : माझा जन्म आईच्या माहेरी हुबळीत झाला. जन्मत:च माझ्यामध्ये दृष्टिदोष होता. मला केवळ रंग आणि माणसांची किंवा वस्तूची केवळ आकृती दिसायची. माझ्यावर उत्तम उपचार व्हावेत, योग्य शिक्षण मिळावे यासाठी वडिलांनी नागपूरला बदली करून घेतली; पण मी दुसरीत असताना एक डोळ्याची दृष्टी गेली. एका स्पर्धेच्या निमित्ताने मुंबईला गेले होते. तेथील अंधशाळेतील शिक्षण मला भावले म्हणून वडिलांना सांगून मी तिसरीला असताना तिथे प्रवेश घेतला आणि वयाच्या नवव्या वर्षीपासूनच माझे स्वावलंबनाचे धडे सुरू झाले. प्राचार्य नमाताई भट यांनी आम्हाला कधीच मुलगी म्हणून वेगळी वागणूक दिली नाही. अंध मुलींनी स्वत:चे करिअर घडवावे, स्वावलंबी व्हावे असा त्यांचा आग्रहच नव्हे तर त्यासाठी त्या लागेल ती धडपड करायच्या. तिथे आम्हाला अगदी खेळापासून विज्ञानाच्या प्रयोगापर्यंत, शालेय अभ्यासक्रमापासून ते संगीतापर्यंतचे शिक्षण दिले जायचे; पण आठवीत गेल्यावर दुसरा डोळाही निकामी झाला. पूर्णत: पसरलेल्या अंधाराचा मला सुरुवातीला त्रास झाला; पण त्यातून मी घडत गेले. एसएनडीटीमध्ये अकरावी-बारावी केले आणि पदवीच्या शिक्षणासाठी पुन्हा नागपूरला आले.

प्रश्न : संगीताची गोडी कशी लागली?
उत्तर : अंधशाळेत रोज सकाळी आणि संध्याकाळी आम्हाला गोकुळदास जोशीसर संगीत शिकवायचे. त्यामुळे मला संगीताची आवड निर्माण झाली. सरांनी आम्हाला संगीताच्या नोट कशा काढायच्या ते शिकवले. नोट काढण्याची सवय लहानपणापासूनच लागल्याने मला शिक्षणाच्या पातळीवर अंध असल्याचा त्रास फारसा झाला नाही. मी सातवीत मध्यमा आणि दहावीत संगीत विशारद झाले. नागपूरमध्ये इंग्रजी, तत्त्वज्ञान आणि संगीत विषय घेऊन पदवीचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, बाबाही निवृत्त झाले. कोल्हापुरात माझे आजी-आजोबा होते; शिवाय शिवाजी विद्यापीठ असल्याने माझ्या पुढील शिक्षणासाठी इथे येणे जास्त संयुक्तिक वाटले आणि आम्ही कोल्हापूरला आलो.

प्रश्न : संगीतातील नवे बदल तुम्ही कसे स्वीकारलात?
उत्तर : कोल्हापुरात आल्यावर मी शिवाजी विद्यापीठातून शास्त्रीय संगीतात एम. ए. आणि पीएच. डी. पूर्ण केले आणि इथेच प्राध्यापक म्हणून रूजू झाले. गेली २८ वर्षे मी विद्यापीठाच्या या संगीत व नाट्यशास्त्र विभागात आहे. या शहराला मुळातच कलेची विशेषत: संगीताची फार मोठी परंपरा लाभली आहे. इथे मला डॉ. भारती वैशंपायन, सुधाकरबुवा डिग्रजकर यांच्याकडून संगीताचे धडे मिळाले. पारंपरिक तानपुरे, इलेक्ट्रॉनिक्स तानपुरा, तबला, हार्मोनियम अशी सगळी वाद्ये मला हाताळता येतात. एवढंच नव्हे तर संगणक, लॅपटॉप, स्मार्ट फोन वापरते. आता तर आयपॅडवरही माझं काम सुरू आहे. सध्या माझ्याकडे चार विद्यार्थी पीएच.डी. करीत आहेत. मुंबई विद्यापीठातील अंबुजा साळगांवकर यांनी रवींद्रनाथांच्या कवितांचा अनुवाद केला, तर मी त्यांना चाली देऊन आम्ही रवींद्र संगीताचा तसेच मूळ बंगाली गीतांचा कार्यक्रम केला. सी. रामचंद्र, मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे यांचे थीमनुसार कार्यक्रम सादर केले. या क्षेत्रात नव-नवे प्रयोग करायला मला आवडतात.

प्रश्न : विभागप्रमुख म्हणून संगीतक्षेत्रात नवे काय करण्याचा मानस आहे?
उत्तर : विद्यापीठातील संगीत विभागाचा अधिकाधिक प्रचार प्रसार व्हावा, विद्यार्थिसंख्या वाढावी यासाठी कृतिशील उपक्रम घेण्याचा माझा मानस आहे. सर्व रागांचा एकत्रित अभ्यास करून तो या क्षेत्रात संशोधन करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भग्रंथ म्हणून वापरता यावा, अशी मांडणी करण्याची इच्छा आहे. रवींद्र संगीतावर आधारित नवे कोर्स सुरू करायचा आहे. गीत-संगीताच्या कार्यक्रमांतून, कार्यशाळांतून या विभागाचा नावलौकिक वाढविण्यावर भर देणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील सोयी-सुविधा, अभ्यासाची साधने, नवनवीन प्रयोग यांबद्दलचे ज्ञान देण्याचा प्रयत्न असेल.

प्रश्न : अंधाराकडून प्रकाशापर्यंतच्या या प्रवासाकडे वळून पाहताना संगीताने आपल्याला काय दिलंय असे वाटतंय?
उत्तर : अंधांना सहानुभूतीचा दृष्टिकोन नको; तर त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याच्या प्रयत्नांची अपेक्षा असते. मी शिकत होते त्यावेळच्या तुलनेत आता खूपच जास्त सोयी-सुविधा अंधांना उपलब्ध आहेत. संगीताने मला ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग दाखविला. भक्ती शिकविली, मूल्य, प्रसन्न शांतता, संयम, समाधानी, सद्गुणी आणि प्रसंगी निग्रही बनविले. आताच्या मुलांमध्येही संगीताची आवड आहे. चिकित्सक वृत्ती आहे आणि हातासरशी प्रगतीची साधने आहेत. त्यांनी ती आत्मसात करावीत आणि ध्येय बाळगून प्रयत्न करावेत, असे वाटते.

Web Title: Priority to anger study - Anjali Nigavekar - Direct Dialogue ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.