Kolhapur News: विकासवाडीतील एमआयडीसीत लघु उद्योगांना प्राधान्य, उद्योजकांना २० एकर जागा देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 04:10 PM2023-01-30T16:10:14+5:302023-01-30T16:10:37+5:30
लघुउद्योजकांसाठी पर्वणीच ठरणार
सतीश पाटील
शिरोली : विकासवाडी येथे होणाऱ्या एमआयडीसीत लघु उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार असून या ठिकाणी वेगळा ले-आउट तयार करून इच्छुक लघु उद्योजकांना २ हजार स्क्वेअर फुटांची जागा देण्यात येणार आहे. लघु उद्योजकांना सुमारे २० एकर जागा दिली जाणार आहे. लघु उद्योजकांच्यासाठीच या एमआयडीसीचा विचार केला आहे.
जिल्ह्यात उद्योग विस्तारासाठी गेल्या १५ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत; पण उद्योग वाढीसाठी जागा मिळत नव्हती. करवीर तालुक्यातील विकासवाडीचा प्रस्ताव हा सन २०१० चा आहे तेव्हापासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी आणि कागल पंचतारांकित एमआयडीसी अशा तीन एमआयडीसी आहेत. सन २००६ ला कागल पंचतारांकितचा विस्तार झाला; पण याठिकाणी जिल्ह्यातील अनेक लघु उद्योगांना जागा मिळाली नाही. अनेक मोठे उद्योग याठिकाणी आले. तर अनेकांनी जागा अडवून ठेवल्या आहेत. त्यामुळे लघु उद्योगांना विस्तारासाठी सध्या जागा उपलब्ध नाही. म्हणून उद्योजकांनी गोकुळ शिरगाव आणि कागल पंचतारांकित या दोन्हींच्या मधील विकासवाडीची जागा मागणी केली होती.
विकासवाडीला जवळपास ४०० हेक्टर जागा होती. त्यातील सध्या २६५ हेक्टर जागा आता शिल्लक आहे. यातील ७० हेक्टर जागा शासनाची असून उर्वरित १९० हेक्टर जागा खासगी शेतकऱ्यांची आहे. ही जागा शेतकऱ्यांशी आणि स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन औद्योगिक विकास महामंडळ या जवळपास २५० हेक्टर जागेवर नवीन औद्योगिक वसाहत विकसित करणार आहे याबाबत जिल्हाधिकारी यांना तसा प्रस्ताव दिला आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी मिळाली की याठिकाणी औद्योगिक वसाहत स्थापन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
आता या एमआयडीसीच्या घोषणेची औपचारिकताच उरली आहे. नव्या वर्षात उद्योजकांसाठी ही भेट मिळणार आहे. या एमआयडीसीतील २० हेक्टरपेक्षा जास्त जागा लघु उद्योगांसाठी राहणार आहे.जिल्ह्यातील जवळपास पन्नास टक्के संख्या असलेल्या लघुउद्योजकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. या एमआयडीसीचा लघु उद्योजकांना फायदा होणार आहे. कागल फाइव्ह स्टार वसाहत आणि गोकुळ शिरगाव एमआयडीसीच्या मध्ये ही प्रस्तावित वसाहत असल्यामुळे तिन्ही वसाहतींना संलग्नता मिळणार आहे.
नवीन विकासवाडी एमआयडीसीसाठी जवळपास २५० हेक्टर जमीन घेण्यासाठी तयारी सुरू आहे. लवकरच याला मंजुरी मिळेल आणि याठिकाणी नवीन एमआयडीसी होईल.- राहुल भिंगारे, प्रादेशिक अधिकारी
करवीर तालुक्यातील विकासवाडी गावात एमआयडीसीचा घाट घातला आहे; पण यासाठी आमच्या गावचा सुद्धा विचार केला पाहिजे नुसते उद्योग विस्तार केला तर गावाला जागाच उरणार नाही.शेती नाहीशी होईल. - अंकुश पुजारी, सरपंच नेर्ली विकासवाडी
या एमआयडीसीत लघु उद्योगांना जागा मिळेल सध्या लघु उद्योगांना जागाच नाही. या ठिकाणी लघु उद्योगांना छोटे छोटे प्लाॅट जरी मिळाले तरी चालतील पण ही एमआयडीसी लवकर होणं गरजेचं आहे. - दीपक चोरगे, गोशिमा अध्यक्ष
विकासवाडी येथील एमआयडीसी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. गेल्या १५ वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग विस्तार झालेला नाही. उद्योग विस्तारासाठी आम्ही शासनाने मागणी केली होती आणि त्याला यश येत आहे. - एम. वाय. पाटील, उपाध्यक्ष स्मॅक