६० वर्षांवरील नागरिकांच्या उपचारांना प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:25 AM2021-05-21T04:25:11+5:302021-05-21T04:25:11+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनामुळे ५३ टक्के मृत्यू हे ६० वर्षांवरील नागरिकांचे, तर ३१ टक्के मृत्यू हे ४५ ते ६० ...
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनामुळे ५३ टक्के मृत्यू हे ६० वर्षांवरील नागरिकांचे, तर ३१ टक्के मृत्यू हे ४५ ते ६० वयोगटातील व्याधिग्रस्त नागरिकांचे झाले आहेत. हा मृत्युदर कमी करण्यासाठी गेल्या वर्षी केलेल्या महाआयुष सर्वेक्षणाच्या आधारावर पुन्हा सर्वेक्षण करून त्यांचे लसीकरण, लक्षणे असल्यास तपासणी व तातडीने उपचार या उपाययोजना करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी त्याबाबतचे नियोजन बारकाईने केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग उच्चांकी असून रोज मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ५० च्या वर आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी-जास्त होत असली तरी मृत्युदर कमी होताना दिसत नाही, त्यातही ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील व्याधिग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण ८१ टक्के आहे. हा मृत्युदर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
अनेक नागरिकांचे मृत्यू लक्षणे दिसताच औषधोपचार न केल्याने व वेळेत उपचारासाठी न आल्याने झाले आहेत. पहिल्या १ ते ३ दिवसांत मृत्यू झालेल्यांची संख्या ४५ टक्के आहे. गेल्या वर्षी महाआयुषअंतर्गत जिल्ह्यातील ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील व्याधिग्रस्त नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या माहितीच्या आधारे पुन्हा या नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांनी लसीकरण केले आहे का, नसेल तर त्यासाठी सोय करून देणे, लक्षणे असल्यास तपासणी आणि उपचारासाठी जाण्याचा सल्ला देणे अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत. पुढील आठवड्यात ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल.
---
जिल्ह्यातील सरपंचांशी आज संवाद
याबाबत आज, शुक्रवारी सर्व ग्रामसमित्या, सरपंच व अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
दहा हजारांवर तपासण्या नेणार
सध्या जिल्ह्यात रोज सहा ते सात हजार कोरोना तपासण्या केल्या जातात. त्यांची संख्या वाढवून १० हजार करण्यात येणार आहे. चाचण्या वाढविल्यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी होईल; तसेच नागरिकांवर लवकर उपचार सुरू होतील, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
---
मृत्युदराची चिंता..
कोरोनाची लाट थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी-जास्त हाेत असते; पण जिल्हाधिकाऱ्यांना चिंता आहे ते मृत्युदराची. नागरिकांचे प्रबोधन करून, तातडीच्या यंत्रणा कार्यान्वित करूनही मृत्युदर का कमी होत नाही, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.
---