तुरुंग अधिकाऱ्यावरील हल्ला सूडभावनेतून?
By admin | Published: September 11, 2014 11:33 PM2014-09-11T23:33:02+5:302014-09-11T23:38:52+5:30
कोल्हापुरातील घटना : गायकवाड यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू
कोल्हापूर : येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात फिरावयास गेलेले कळंबा मध्यवर्ती कारागृहातील मंडल तुरुंग अधिकारी उत्तरेश्वर निवृत्ती गायकवाड (वय ४३, मूळ राहणार उरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे, सध्या राहणार कळंबा अधिकारी निवासस्थान) यांच्यावर झालेला हल्ला हा सूडभावनेतून की अन्य कारणांमुळे झाला, या दृष्टिकोनातून तपास सुरू असल्याचे राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले.
काल, बुधवारी रात्री मंडल तुरुंग अधिकारी उत्तरेश्वर गायकवाड यांच्यावर पाठीमागून आलेल्या तीन अज्ञातांनी स्टंप व काठ्यांनी मारहाण करून हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यांच्यावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
गायकवाड हे नेहमीप्रमाणे आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात चारचाकी गाडी लावून चालत फिरावयास गेले. पुन्हा तेथून ते संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जात असताना पाठीमागून आलेल्या दोन ते तीन अज्ञातांनी त्यांच्या डोक्यावर व पायावर लाकडी काठी व स्टंपने हल्ला केला. या हल्ल्यानंतर ते अज्ञात पसार झाले. (प्रतिनिधी)
कैद्यांची माहिती घेण्याचे काम सुरू
गायकवाड यांच्यावर हल्लाप्रकरणी पोलिसांनी कळंबा मध्यवर्ती कारागृहात जाऊन या बरॅकमध्ये असलेल्या कैद्यांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. हा हल्ला कशामुळे झाला, त्याचा शोध घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उत्तरेश्वर गायकवाड यांच्यावरील हल्ला प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. या हल्ल्यामागे नेमका हेतू काय आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
- अमृत देशमुख, पोलीस निरीक्षक
इतर कारागृहांतून माहिती घेणार...
गायकवाड यांची यापूर्वी सेवा ठाणे, पुणे व सोलापूर येथील कारागृहांत झाली आहे. तेथील कारागृहांतूनही माहिती घेण्यात येणार आहेत. हा हल्ला स्थानिकांकडून झाला आहे की अन्य कोणी केला आहे, या दृष्टिकोनातून तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.