अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबू
By admin | Published: September 28, 2016 12:35 AM2016-09-28T00:35:17+5:302016-09-28T00:37:08+5:30
रंकाळा प्रदूषण प्रश्न : हरित लवादाचा इशारा; दोघांचे वेतन रोखण्याचे आदेश
कोल्हापूर : रंकाळा प्रदूषणमुक्त करण्यासाठी दिरंगाई केल्याबद्दल तसेच कोणतेही प्रदूषण रोखण्याची भक्कम उपाययोजना सादर करण्यात कसूर केली त्याबद्दल कोल्हापूर महापालिकेच्या पर्यावरण अभियंता व जलअभियंता या दोघांचे वेतन रोखण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाचे न्या. यू. डी. साळवी व तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिले. पुढील तारखेपर्यंत रंकाळा प्रदूषणमुक्तीचा सर्वसमावेशक असा अहवाल व उपाययोजना सादर न केल्यास अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबण्याचे आदेश दिले जातील, असा कडक इशाराही या आदेशात दिला. सुनील केंबळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली.
लवादाने पर्यावरण अभियंता आर. के. पाटील व प्रभारी जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांचे वेतन रोखण्याचे आदेश दिले व पुढील आदेश होऊपर्यंत वेतन देऊ नये असे आयुक्तांना आदेश दिले. तसेच रंकाळा तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका कोणत्या उपाययोजना करणार आहे, याबद्दल सर्वसमावेशक तसेच भक्कम प्रस्ताव सादर करण्याचेही आदेश देत सुनावणी २५ आॅक्टोबरपर्यंत स्थगित केली.
महापालिका लावादापासून लपाछपीचा खेळ खेळत आहे. तसेच रंकाळा प्रदूषणमुक्त करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत नसल्याचे कडक ताशेरे लवादाने ओढले. मागील काही दिवसांपासून लवादाने वेळोवेळी आदेश देत रंकाळा तलावाच्या भोवतालच्या वसाहतीतून जे सांडपाणी वाहते, त्याचे नियोजन व प्रक्रिया कशी करणार, यावर वारंवार विचारणा केली.
सुनावणीस महापालिकेतर्फे कोण अधिकारी उपस्थित आहे, अशी विचारणा केली असता कोणीच जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर लवादाचा पारा अधिकच चढला. लवादाने महापालिकेची रंकाळा प्रदूषणमुक्त करण्याची इच्छाशक्तीच दिसत नसल्याचे कडक ताशेरे ओढले. त्याचवेळी लवादाने आपले अधिकार वापरून पर्यावरण अभियंता आर. के. पाटील व प्रभारी जल अभियंता सुरेश कुलकर्णा यांचे वेतन रोखण्याचे आदेश दिले व पुढील आदेश होईपर्यंत वेतन देऊ नये, असे आयुक्तांना आदेश दिले. तसेच रंकाळा तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका कोणत्या उपाययोजना करणार आहे, याबद्दल सर्वसमावेशक तसेच भक्कम प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत, सुनावणी २५ आॅक्टोबरपर्यंत स्थगित केली. (प्रतिनिधी)
उत्सव साजरा करायचाय का?
याचिकाकर्ते सुनील केंबळे यांनी, खुद्द आयुक्तांनाच इथे उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती लवादास केली; पण लवादाने त्यांना बोलावून काय उत्सव साजरा करायचा आहे का? असा खोचक प्रश्न करून जबाबदारीची जाणीव करून दिली.
महापालिकेस सुनावले
मंगळवारी सुनावणीवेळी महापालिकेतर्फे वकील धैर्यशील सुतार यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला; पण लवादाचे समाधान झाले नाही. त्यावर लवादाने महापालिकेने जबाबदारीने विधाने करावीत, असे सुनावले.