कोल्हापुरातील सबजेलमधून पळालेल्या कैद्याच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांना २८ तास दिला चकवा
By उद्धव गोडसे | Published: October 28, 2023 05:10 PM2023-10-28T17:10:50+5:302023-10-28T17:11:05+5:30
कारागृहातील सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून पळाला होता
कोल्हापूर : बिंदू चौक सबजेलच्या भिंतीवरून उडी मारून पळालेला कैदी धनराज कुमार (वय २३, मूळ रा. बिहार) हा शनिवारी (दि. २८) दुपारी बागल चौकात शाहूपुरी पोलिसांच्या हाती लागला. कारागृहातील सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून तो शुक्रवारी (दि. २७) सकाळी पळाला होता.
मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेला धनराज कुमार याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. शुक्रवारी सकाळी तो बिंदू चौक सबजेलमधील १८ ते २० फुटांची भिंती चढून बाहेर उडी टाकून पळाला होता. हा प्रकार लक्षात येताच शहरातील जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.
शहरात ठिकठिकाणी फिरून तो उपजीविका करीत होता, त्यामुळे फूटपाथ आणि खाद्य पदार्थांच्या गाड्यांवर त्याचा शोध सुरू होता. शनिवारी दुपारी बागल चौकात तो शाहूपुरी पोलिसांच्या हाती लागला. यापूर्वी त्याने शाहूपुरी पोलिसांच्या हद्दीत चोरीचा गुन्हा केला होता.