खिडकीतून उडी टाकून कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 06:42 PM2020-07-29T18:42:39+5:302020-07-29T18:44:47+5:30
कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) वसतिगृहात उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून एका कैद्याने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंगळवारी (दि. २८) सायंकाळी केला.
कोल्हापूर : कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) वसतिगृहात उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून एका कैद्याने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंगळवारी (दि. २८) सायंकाळी केला. तानाजी दिलीप मंगे (वय २९, रा. उस्मानाबाद, सध्या तात्पुरते कारागृह, आयटीआय) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंदीजन तानाजी मंगे याला पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची रवानगी कळंबा आयटीआय येथील तात्पुरत्या कारागृहात करण्यात आली होती.
त्याने मंगळवारी स्वच्छतागृहात जाण्याच्या बहाण्याने पहिल्या मजल्यावरील खिडकीतून खाली जमिनीवर उडी मारली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. याबाबतची फिर्याद संदीप जयसिंग पाटील (रा. केनवडे, ता. कागल व सध्या कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कळंबा) यांनी दिली.