कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्याची आत्महत्या, कापडी पट्टीने घेतला गळफास
By तानाजी पोवार | Published: September 8, 2022 01:32 PM2022-09-08T13:32:35+5:302022-09-08T13:51:16+5:30
गंभीर गुन्ह्यांतील कैद्याने आत्महत्या केल्याने कळंबा कारागृह प्रशासन हादरले
कोल्हापूर : मोका अंतर्गत कारवाई झालेल्या सांगली जिल्ह्यातील कैद्याने कापडी पट्टीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, गुरुवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहात घडली. भरत बाळासाहेब घसघशे ( २९, रा. वाडकर गल्ली, आष्टा जि. सांगली ) असे या मृत कैद्याचे नाव आहे. कारागरातील सर्कल क्र. सात शौचालयाशेजारी असलेल्या भिंतीजवळ आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.
गंभीर गुन्ह्यांतील कैद्याने आत्महत्या केल्याने कळंबा कारागृह प्रशासन हादरले. कारागरातील वरिष्ठ अधिकाऱ्यासह राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जाधव, यांच्यासह अधिकाऱ्यांनी पहाटे घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह उत्तरणीय तपासण्यासाठी शासकीय रुग्णालयात नेला.
गर्दी, मारामारी, बेकायदा शस्त्रे कब्जात बाळगल्या प्रकरणी भरत घसघशे याच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीसात गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. 2019 मध्ये घसघस याच्यासह सहा साथीदारांवर मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण) कायद्यांतर्गत कारवाई केली होती. सध्या तो कळंबा कारागृहात होता. गुरूवारी पहाटे साडेतीन वाजता त्याने कापडी पट्टीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कारागृहातील अन्य कैद्यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारागृहातील अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले, या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली.