कळंबा कारागृहात नैराश्यातून कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 06:52 PM2017-11-15T18:52:49+5:302017-11-15T18:59:22+5:30
कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने नैराश्यातून अंगावर ब्लेडने दहा गंभीर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गणेश पोपट शिंदे (वय ३०, रा. कुरुडवाडी, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे.
कोल्हापूर : येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने नैराश्यातून अंगावर ब्लेडने दहा गंभीर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गणेश पोपट शिंदे (वय ३०, रा. कुरुडवाडी, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे.
बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. कारागृह कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, कैदी शिंदे याने एका दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्याच्या छळास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे; परंतु कारागृहाच्या प्रशासनाने कारागृहातील कोणत्याच कैद्याचा छळ केला जात नसल्याचे स्पष्ट केले.
अधिक माहिती अशी, सोलापूर येथे २०१४ मध्ये एका सहकारी मित्राचा हॉटेलमध्ये दारू पिण्यावरून वाद झाला होता. त्यातून गणेशने पंचवीस वर्षांच्या तरुणाचा चाकूने भोसकून खून केला.
या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. गेल्या चार वर्षांपासून तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. २०१५ मध्ये त्याने अशाच प्रकारे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कैद्यांशी वादावादी करीत असल्याने तो कारागृहात नेहमीच वादग्रस्त ठरत होता.
गेल्या महिन्याभरापासून तो शांत होता. फारसा कोणाशी बोलत नव्हता. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास तो बरॅक दोनमधील सर्कल पाचच्या स्वच्छतागृहात गेला. बराच वेळ तो बाहेर न आल्याने अन्य कैद्यांनी जाऊन पाहिले असता तो रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्याच्या हातामध्ये ब्लेड होते. अंगावरील पांढरे कपडे रक्ताने माखले होते.
हा भयानक प्रकार पाहून कैद्यांनी येथील सुरक्षारक्षकांना या प्रकाराची माहिती दिली. तत्काळ सुरक्षारक्षक विजय खामकर, राहुल पळसे यांनी स्वच्छतागृहात येऊन गणेशच्या हातातील ब्लेड काढून घेत त्याला रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
येथील डॉक्टरांनी पाहिले असता त्याने स्वत:च्या पोटावर चार, हातावर तीन व उजव्या पायाच्या मांडीवर तीन असे दहा वार करून घेतल्याचे दिसून आले. त्याच्या पोटावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. गणेश हा अविवाहित आहे. तो वादग्रस्त असल्याने त्याच्या हालचालींवर येथील कर्मचारी बारीक लक्ष ठेवून असतात.
‘त्या’ कर्मचाऱ्यांची चौकशी होणार?
कारागृहात कैद्यांना दाढी करण्यासाठी ब्लेड पुरविले जाते. दाढी केल्यानंतर ते जमा करून घेतले जाते. त्यामुळे गणेश शिंदे याच्याकडे ब्लेड आले कोठून? याबाबत कारागृह प्रशासनाने चौकशी केली असता आठ दिवसांपूर्वी त्याने ब्लेड मागवून घेतले होते. ते परत न करता त्याने स्वत:कडेच ठेवले होते. त्याचा वापर त्याने बुधवारी केला.
ब्लेड जमा करून घेणाऱ्या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला आहे. कारागृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘त्या’ जबाबदार कर्मचाऱ्याची प्रशासकीय चौकशी वरिष्ठ अधिकारी करणार का? असा प्रश्न उपस्थित होतो.
सोमालिया कैद्यांचा छळ
कळंबा कारागृहात महिन्यापूर्वी सोमालिया येथील १२० दहशतवाद्यांना बंदिस्त केले आहे. या कैद्यांचा महाराष्ट्रातील कैदी छळ करीत असल्याची चर्चा आहे. मारहाण, हातापायांचा मसाज करवून घेणे, बराकी साफ करणे अशा प्रकारची कामे त्यांच्याकडून करवून घेतली जात आहेत. येथील अधिकारी व कर्मचारीही त्यांना अमानुष मारहाण करीत असल्याची चर्चा आहे.
जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे गणेश शिंदे हा निराश होता. कारागृहात त्याचे वागणे विचित्रपणाचे असायचे. यापूर्वीही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याची मनोविकार तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली जाईल.
शरद शेळके,
कारागृह अधीक्षक