‘कमलेश’साठी ‘चेतना’चे द्वार झाले खुले, मंगळवारपासून जाणार शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 06:12 PM2018-10-04T18:12:00+5:302018-10-04T18:45:06+5:30
मानसिक विकृतांच्या त्रासाला बळी पडलेला कमलेश उर्फ विनायक सुरेश मकणापुरे हा आता मंगळवार (दि. ९) पासून ‘चेतना अपंगमती विकास मंदिर’ या विशेष शाळेत जाणार आहे. प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तो नियमितपणे शेंडा पार्क येथील शाळेत अभ्यासाचे धडे गिरविणार आहे.
कोल्हापूर : मानसिक विकृतांच्या त्रासाला बळी पडलेला कमलेश उर्फ विनायक सुरेश मकणापुरे हा आता मंगळवार (दि. ९) पासून ‘चेतना अपंगमती विकास मंदिर’ या विशेष शाळेत जाणार आहे. प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तो नियमितपणे शेंडा पार्क येथील शाळेत अभ्यासाचे धडे गिरविणार आहे.
कमलेश ऊर्फ ओबामा या नावाने सोशल मीडियावर त्याचे विकृत चित्रीकरण प्रसिद्ध झाले. त्याच्या आगळ्यावेगळ्या नाचगाण्यामुळे तो सर्वत्र अल्पावधीत प्रसिद्ध झाला. अनेक विकृत मंडळींनी त्याचा वापर केवळ मनोरंजनासाठी केला. त्यात त्याचे मोबाईलवरून चित्रीकरण करून सर्वत्र व्हायरल केले.
प्रत्यक्षात हे चित्रीकरण पाहिल्यानंतर त्याच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यामुळे सध्या तो घरी निवांत आहे. वडील सुरेश हे गवंडीकाम, तर आई जयश्री घरकाम करते. गणेश कॉलनी, संभाजीनगर येथे त्यांची वडिलार्जित पाच बाय १० ची स्वमालकीची खोली आहे. त्यात विनायकचे दोन भाऊ, आई-वडील असे पाचजण राहतात.
विनायकचा जन्म २५ आॅगस्ट २००४ चा असून तो गतिमंद असल्याचे आई-वडिलांना फार उशिरा समजले. डॉक्टरांनीही तो जसा वयाने मोठा होईल, तसे मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत होऊन तो नियमित चालेल, बोलेल, असे सांगितले. त्याला संभाजीनगरातील विद्यालयातही घातले; पण तो शाळेतील शिक्षकांना कारणे सांगून बाहेर पळून जाऊ लागला. कालांतराने त्याची शाळा बंद झाली.
पालकांचे तो काहीही ऐकत नाही. उलट बाहेरील व्यक्तींनी त्याला अमुक एक कर म्हटले की तो तत्काळ ती कृती करतो; म्हणून मानसिक विकृतांनी त्याचा मनोरंजनासाठी वापर केला आणि चित्रफिती प्रसारित केल्या. त्याची ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर ‘चेतना’चे प्राचार्य पवन खेबुडकर यांनी त्याच्या पालकांशी चर्चा करून त्याला सीपीआर रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र आणण्यास सांगितले आहे. या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तो नियमितपणे मंगळवार (दि. ९) पासून ‘चेतना’च्या शेंडा पार्क येथील विशेष शाळेत जाणार आहे.
कमलेशच्या पालकांना मंगळवारपासून त्याला ‘चेतना’मध्ये सोडण्यास सांगितले आहे. तो या ठिकाणी निश्चितपणे रमेल आणि स्वत:च्या पायावर उभा राहील.
- पवन खेबुडकर,
प्राचार्य, चेतना अपंगमती विकास मंदिर
‘चेतना’कडून मदतीचा हात मिळाल्यानंतर ‘कमलेश’ची काही प्रमाणात चिंता मिटली आहे. कमलेश घराबाहेर जाऊ नये म्हणून त्याच्यासमोर लाकडी पट्टी, चौकट टाकल्यानंतर तो दिवसभर त्यावर खिळे मारण्यात गुंग असतो. त्याला सुतारकामात अधिक रस आहे.
- सुरेश मकणापुरे,
कमलेशचे वडील