अंबाबाई मंदिरातील खासगी अभिषेक बंद, देवस्थानच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:50 AM2019-06-05T10:50:31+5:302019-06-05T10:53:05+5:30

करवीरनिवासिनी कोल्हापूरची श्री अंबाबाई मंदिरात खासगी पुजाऱ्यांकडून केले जाणारे अभिषेक बंद करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. देवीच्या पूजेचा वार असलेले श्रीपूजक आणि देवस्थान समितीचे पुजारी वगळता अन्य कोणत्याही पुजाऱ्यांना आता गरुड मंडपात अभिषेक करता येणार नाही.

A private Abhishek bandh in Ambabai Temple, decision in the meeting of the temple | अंबाबाई मंदिरातील खासगी अभिषेक बंद, देवस्थानच्या बैठकीत निर्णय

अंबाबाई मंदिरातील खासगी अभिषेक बंद, देवस्थानच्या बैठकीत निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देअंबाबाई मंदिरातील खासगी अभिषेक बंद, देवस्थानच्या बैठकीत निर्णयभाविकांच्या फसवणुकीला बसणार आळा

कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरची श्री अंबाबाई मंदिरात खासगी पुजाऱ्यांकडून केले जाणारे अभिषेक बंद करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. देवीच्या पूजेचा वार असलेले श्रीपूजक आणि देवस्थान समितीचे पुजारी वगळता अन्य कोणत्याही पुजाऱ्यांना आता गरुड मंडपात अभिषेक करता येणार नाही.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर प्रथमच झालेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करणे, मंदिर परिसराचा विकास, गरजू रुग्णांसाठी लॅब, देवस्थानअंतर्गत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी वाटप, मंदिराच्या पाचही शिखरांचे स्ट्रक्चरल आॅडिट अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पोवार, सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, एस. एस. साळवी, सुयश पाटील उपस्थित होते.

अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपात रोज अभिषेक विधी केला जातो. मंदिरात देवीच्या पूजेचा आठवडा असलेले पुजारी व देवस्थान समितीचे पुजारी वगळता अन्य पुजारीदेखील येथे अभिषेक विधी करतात. यांतील काही पुजारी हे श्रीपूजकांकडे सेवेकरी म्हणून काम करतात, तर काही पुजारी बाहेरचे आहेत.

अशा पुजाऱ्यांकडून भक्तांना देवीचा अभिषेक घडवून दिला जातो, परस्पर पावती केली जाते, भरमसाट दक्षिणा घेतली जाते, यातून भाविकांची लूट व फसवणूक होते, अशा तक्रारी समितीकडे आल्या आहेत. याची दखल घेत समितीने वार असणारे श्रीपूजक व देवस्थान समितीचे पुजारी वगळता अन्य खासगी पुजाऱ्यांना अभिषेक करण्यास मज्जाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय परिसरातील पूजेचे साहित्य विकणारे दुकानदार, हारविक्रेते, समितीचे सुरक्षारक्षक यांच्याकडून भाविकांना व्हीआयपी दर्शन घडविले जाते. त्यासाठी पैशांचीदेखील देवाणघेवाण होते. या प्रकारावरही समिती निर्बंध घालणार आहे. दरम्यान, मंगळवारच्या बैठकीत देवस्थान समितीअंतर्गत असलेल्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी धनादेशाचे वाटप करण्यात आले.

अतिक्रमण हटाव मोहीम आजपासून

समितीने मंदिराच्या निश्चित केलेल्या हद्दीतील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेला पत्र देण्यात आले आहे. परिसरातील गार्डन, माउली लॉज, खासगी मंदिरांचा यात समावेश आहे. त्याबाबत आज, बुधवारी सकाळी ११ वाजता पुन्हा पाहणी करण्यात येणार आहे.

सोन्याच्या मुलाम्यासाठी शिखरांचे स्ट्रक्चरल आॅडिट

अंबाबाई मंदिराच्या पाचही शिखरांना सोन्याचा मुलामा देण्याच्या दृष्टीने शिखरांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पिडिलाईट या कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले असून, ते विनामोबदला ही सेवा देणार आहेत. शिखरांची स्थिती, मोजणी याबाबत माहिती घेतल्यानंतर सोन्याचा मुलामा देण्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेतला जाईल. सोन्याचा मुलामा देण्यासाठी सात कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

कार्यालयाचे नूतनीकरण

समितीच्या शिवाजी पेठेतील मुख्य कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. तीन हजार स्क्वेअर फूट जागेत होणाऱ्या या कामासाठी ८० ते ८८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. हे नूतनीकरण होईपर्यंत समितीचे कार्यालय त्र्यंबोली टेकडी येथे हलविण्यात येणार आहे. पुढील दोन दिवसांत ही कार्यवाही सुरू होईल.

लॅबसाठी देवल क्लबची जागा

समितीच्या वतीने गरजू रुग्णांसाठी माफक दरात विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करून देणारी लॅब सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी खासबाग येथील नवीन देवल क्लबच्या मागील बाजूची इमारत निश्चित करण्यात आली आहे. सध्या ती भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असली तरी भविष्यात खरेदी करण्याचा समितीचा विचार आहे.
 

Web Title: A private Abhishek bandh in Ambabai Temple, decision in the meeting of the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.