खासगी बस जळून खाक, ३५ प्रवाशी सुखरूप. कोल्हापूरनजीक शेणवडे येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:36 AM2018-09-29T10:36:59+5:302018-09-29T10:40:53+5:30
मुंबईहून गोव्याकडे जात असलेल्या रेजिना या टॅÑव्हलसला शॉटसर्किट ने आग लागून ती जळून खाक झाली. मात्र यामध्ये असणाऱ्या एकूण ३५ प्रवाशांना चालक जॉर्ज फर्नांडिस यांनी मोठ्या शिताफीने बाहेर काढत त्यांच्या सुरक्षितेची परिपूर्ण काळजी घेतली.
कोल्हापूर : मुंबईहून गोव्याकडे जात असलेल्या रेजिना या टॅÑव्हलसला शॉटसर्किट ने आग लागून ती जळून खाक झाली. मात्र यामध्ये असणाऱ्या एकूण ३५ प्रवाशांना चालक जॉर्ज फर्नांडिस यांनी मोठ्या शिताफीने बाहेर काढत त्यांच्या सुरक्षितेची परिपूर्ण काळजी घेतली. ही घटना पहाटे ३. २० च्या सुमारास पहाटे कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबाबडा तालुक्यातील शेणवडे गावानजीक घडली.
रेजिना ही ट्रॅव्हलस (जी.ए. ०८-सी- ६५५५) ही मुंबईहून गोव्याकडे जात होती. पहाटे गगनबाबडा तालुक्यातील शेणवडे गावानजीक आली असता, यावेळी चालक फर्नांडिस यांना गाडीत शॉटसर्किट होत असल्याचे जाणवले. त्यांनी तत्काळ ट्रॅव्हलसला बाजू घेत प्रवाशांना आधी सुखरूप बाजूला काढले. यानंतर गाडीतील प्रवाशी तसेच वाहक ईमानसाहब व परिसरातील लोकानी धावाधाव करीत लागलेली आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु आगीने घेतलेल्या रौद्ररुपपुढे ग्रामस्थांसह सर्वांचे प्रयत्न अपुरे पडले.
यानंतर घटनास्थळी पोलीस पाटील, गगणबाबडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन मदनव्वाना व अग्निशमनदल दाखल झाले. सर्वांनी तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु घटनास्थळी वेळेत मदत मिळेपर्यंत या ट्रॅव्हलसने पूर्ण पेटून जळून खाक झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या घटनेची दखल पोलीस ठाण्यात घेतली असून गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून घेण्याचे काम सुरु आहे.यामध्ये गाडीचे पूर्णत: तसेच प्रवाशांच्या जवळ असलेल्या महत्वाच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले.
या परिसरातील ही दुसरी घटना
चार महिन्यापूर्वी देखिल एक खासगी बसने लोंगे येथे पेट घेतला होता. त्यातही ती बस जळून खाक झाली होती. त्यामुळे खासगी आराम बसच्या सुरक्षेतेविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.