खासगी रुग्णालयांनी बेड मॅनेजमेंट डॅशबोर्ड अपडेट करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:27 AM2021-04-28T04:27:28+5:302021-04-28T04:27:28+5:30
कोल्हापूर : खासगी रुग्णालयांनी जिल्हा प्रशासनाने तयार केलेला बेड मॅनेजमेंट डॅशबोर्ड वेळच्या वेळी अपडेट करावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज ...
कोल्हापूर : खासगी रुग्णालयांनी जिल्हा प्रशासनाने तयार केलेला बेड मॅनेजमेंट डॅशबोर्ड वेळच्या वेळी अपडेट करावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांनी व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, खासगी रुग्णालयांचे डॉक्टर्स यांच्याशी संवाद साधला.
मंत्री पाटील म्हणाले, १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने जास्तीत-जास्त खासगी रुग्णालयांनी कोविन पोर्टलवर आपली नोंदणी करावी. नागरिकांसाठी मांडव उभारावा, सूचना देण्यासाठी पब्लिक ॲड्रेस यंत्रणा सुरू करावी. केंद्रावर पिण्याच्या पाण्यासह आवश्यक त्या सुविधा कराव्यात. स्पीकर यंत्रणा ठेवावी.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, खासगी रुग्णालयांचे ऑक्सिजन, स्ट्रक्चरल, फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करण्यासाठी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे. असणाऱ्या त्रुटी पूर्ण करा. टास्क फोर्सच्या सदस्यांनाही रुग्णालयांचे वाटप करण्यात येईल. लसीकरण केंद्राच्या नोंदणीसाठी पुढे यावे.
नोडल अधिकारी डॉ. फारुख देसाई यांनी पोर्टलवरील नोंदणी, लसीकरण यांबाबत माहिती दिली.
बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, डॉ. उषादेवी कुंभार, तहसीलदार अर्चना कापसे, रंजना बिचकर उपस्थित होत्या.