खासगी प्राथमिक शाळांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 01:09 PM2018-11-23T13:09:06+5:302018-11-23T13:10:07+5:30
जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत करावे, अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने शिक्षणमंत्री व शिक्षण सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली,
कोल्हापूर : जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत करावे, अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने शिक्षणमंत्री व शिक्षण सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली, अशी माहिती समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
राज्यातील खासगी प्राथमिक शाळांच्या वेतनासाठी १९८५ मध्ये वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथकांची स्थापना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी झाली. जिल्हा मध्यवर्ती बॅँकांमार्फत खासगी प्राथमिक शाळांचे वेतन करण्यात येऊ लागले. मात्र गेल्या ३५ वर्षांचा अनुभव पाहता, दरमहा एक तारखेला पगार होत नाही. तसेच राष्ट्रीयीकृत बॅँकेमार्फत वेतन झाल्यास या बँका आपल्याकडील वेतनधारक सभासदाला एटीएम कार्ड, ओ.डी., गृह आणि वाहन तारण कर्ज, पगार तारणावर तत्काळ कर्ज, वेतनासाठी अनुदान आले नसले तरीही एक तारखेला पगार, मोफत पासबुक अशा सुविधा देते; पण या सुविधा जिल्हा बँकेकडून मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. तरी याचा विचार करून राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत पगार द्यावा. याप्रसंगी उपाध्यक्ष सारंग पाटील, सचिन परीट, आदी उपस्थित होते.