कोल्हापूर महापालिकेच्या उद्यानांसाठी खासगी सुरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:06 PM2019-05-16T12:06:35+5:302019-05-16T12:08:16+5:30
कोल्हापूर महापालिकेची ५४ उद्याने, मैदाने व सांस्कृतिक हॉल, आदींच्या सुरक्षेसाठी खासगीरक्षक नेमण्याचा प्रस्ताव आहे. उद्यान आणि मैदाने तळिरामांचे अड्डे बनले आहेत. रात्रीच्या वेळी येथे अवैध प्रकारांना ऊत येतो. या प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.
कोल्हापूर : महापालिकेची ५४ उद्याने, मैदाने व सांस्कृतिक हॉल, आदींच्या सुरक्षेसाठी खासगीरक्षक नेमण्याचा प्रस्ताव आहे. उद्यान आणि मैदाने तळिरामांचे अड्डे बनले आहेत. रात्रीच्या वेळी येथे अवैध प्रकारांना ऊत येतो. या प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.
शहरात महापालिके ची ५४ उद्याने आहेत. तसेच अनेक सांस्कृतिक हॉल व मैदानांची सुरक्षा रामभरोसे आहे. हॉल व मैदानांवर कर्मचारी तैनात आहेत. त्यावर मर्यादा आहेत. सुरक्षेसाठी महापलिकेचे कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करतात. तरीही महापालिकेच्या या मिळकतींमध्ये रात्रीच्या वेळी अवैध प्रकारांना ऊत येतो. मैदाने ओपन बार बनली आहेत. याबाबत नागरिकांतून तक्रारी येत आहेत. महापालिकेची यंत्रणा कमी पडत असल्याने तक्रारींकडे कानाडोळा केला जात असल्याने नाराजी आहे.
ओपन बारवर पोलीस प्रशासन वेळोवेळी कारवाई करते; पण कारवाईनंतर पुन्हा ओपन बार जोरात सुरू होतात. महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. अवैध वापरामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उद्यानांमध्ये जेवणावळीसह ओपन बार, गांजा पार्ट्या रंगतात, याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी खासगी सुरक्षारक्षक नेमण्याची सूचना केली होती.
ही ठिकाणे सुस्थितीत व सुरक्षित राहण्यासाठी खासगी सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. बांधकाम विभागाने तयार केलेला प्रस्ताव रचना व कार्यपद्धती विभागाकडे पाठविला आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हैसूर अभ्यासदौऱ्यावरून आल्यानंतर यावर ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.