खासगी तंत्रनिकेतनचे अनुदान थकीत
By admin | Published: February 11, 2017 12:38 AM2017-02-11T00:38:28+5:302017-02-11T00:38:28+5:30
पगार थांबल्याने ५0 हजार शिक्षक, कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
कोल्हापूर : राज्यातील विनाअनुदानित खासगी तंत्रनिकेतनचे सुमारे सव्वा लाख शिक्षक, कर्मचारी वेतन मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत. तंत्रनिकेनला विद्यार्थ्यांसाठीच्या सवलतींचे अनुदान शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने ४ ते १० महिन्यांपासून शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे.
सध्या राज्यात विनाअनुदानित तंत्रनिकेतनची संख्या ४२० असून यामध्ये सुमारे ५० हजार शिक्षक, तर ७५ हजार शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. या शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन हे विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या ट्युशन फी (शिक्षण शुल्क) मधून अदा केले जाते. ईबीसी, ओबीसी, अल्पभूधारक, अल्पसंख्याक, आदी विविध शिष्यवृत्ती, सवलतीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ट्युशन फीमधील ५० ते १०० टक्के अनुदान राज्य शासन हे समाजकल्याण, केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक, आदी विभागांकडून प्रत्येक तंत्रनिकेतनला दिले जाते. मात्र, बहुतांश तंत्रनिकेतनला शासनाकडून संबंधित अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे या तंत्रनिकेतनमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. गेल्या ४ ते १० महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालेले नाही. वेतन नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ज्ञानदानाचे काम करूनही वेतन मिळत नसल्याने शिक्षक, कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. (प्रतिनिधी)
‘दिले-घेतले’द्वारे अन्याय
वेतन थकीत राहण्यामागे अनुदान मिळाले नसल्याचे एक कारण आहेच. मात्र, त्याबरोबर ‘दिले-घेतले’च्या माध्यमातून काही संस्थाचालकांचा भ्रष्टाचारदेखील कारणीभूत असल्याचे टीचर्स असोसिएशन फॉर नॉन-एडेड पॉलिटेक्निक्सचे (टॅफनॅफ) राज्य सचिव प्रा. श्रीधर वैद्य यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘दिले-घेतले’मध्ये शिक्षकांना शासनाच्या नियमानुसार वेतन दिले जात असल्याचे कागदोपत्री दाखविले जाते. मात्र, प्रत्यक्षात वर्षाच्या सुरुवातीला काही संस्थाचालक हे शिक्षक, कर्मचाऱ्यांकडून काही कोरे धनादेश (चेक) घेतात. याद्वारे वेतनातील ठरावीक रक्कम दरमहा घेतात. त्यामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या हातात नियमापेक्षा कमी वेतन पडते. शिवाय त्यासाठी अनेकदा दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागते. गेल्या १४ महिन्यांपासून अनेक तंत्रनिकेतनमध्ये वेतन अदा झालेले नाही. यावर अखेर वैतागून गडचिरोलीतील काही शिक्षक, कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तंत्रनिकेतनचे लेखापरीक्षण केल्यास तेथील वास्तव निश्चितपणे समोर येईल.