'अंनिस'मुळे टळली नववधूची कौमार्य चाचणी, कोल्हापुरात समोर आला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 11:29 AM2022-01-22T11:29:10+5:302022-01-22T11:30:43+5:30

यापूर्वी ज्या मुला-मुलींनी यासाठी नकार दिला, त्यांना सामाजिक विरोधाला सामोरे जावे लागले होते.

Probable virginity test for the bride after the wedding ceremony in kolhapur | 'अंनिस'मुळे टळली नववधूची कौमार्य चाचणी, कोल्हापुरात समोर आला धक्कादायक प्रकार

'अंनिस'मुळे टळली नववधूची कौमार्य चाचणी, कोल्हापुरात समोर आला धक्कादायक प्रकार

Next

कोल्हापूर : शिरोली परिसरातील एका विवाह समारंभानंतर गुरुवारी नववधूची होणारी संभाव्य कौमार्य चाचणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हस्तक्षेपामुळे टळली. अंनिसच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी हॉल मालक, वधू-वर व त्यांच्या पालकांना नोटीस पाठवून त्यांचा जबाब घेतला. या वेळी त्यांनी आम्ही असा कोणताही प्रकार करणार नसल्याचे सांगितले. कौमार्य चाचणीसाठी सक्ती केली जात असल्यास तरुण-तरुणींनी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले, शिरोली परिसरातील एका हॉलमध्ये गुरुवारी एका समाजातील विवाह समारंभ होणार होता. विवाहानंतर तेथेच वधूची कौमार्य चाचणी केली जाणार होती, अशी तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे एकाने केली होती. समितीने शिरोली एमआयडीसीच्या पोलीस उपनिरीक्षकांना ही कौमार्य चाचणी रोखण्यात यावी अशी मागणी केली.

त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र खांडवे, हवालदार आर. बी. कुंभार, नीलेश कांबळे यांनी हाॅल मालक, वधू-वर आणि त्यांच्या पालकांना नोटीस काढून याबाबत जबाब घेतला. या वेळी त्यांनी आम्ही अशी कोणतीही चाचणी करत नसल्याचे त्या कुटुंबीयांनी जबाबात सांगितले. ही चाचणी रोखण्यासाठी कृष्णा चांदगुडे, ॲड. रंजना गवांदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद शिंदे, रामदास देसाई, स्वाती कृष्णात, मुक्ता निशांत, राजवैभव शोभा, निशांत शिंदे यांनी प्रयत्न केले.

अंनिसकडे संपर्क साधा..

- समाजात असे विधी होत नाही असा दावा केला जातो, मात्र समितीकडे या समाजात आजही कौमार्य चाचणीची प्रथा असल्याचे पुरावे आहेत. यापूर्वी ज्या मुला-मुलींनी यासाठी नकार दिला, त्यांना सामाजिक विरोधाला सामोरे जावे लागले होते. अलिकडेच नाशिकमधील एका उच्च शिक्षीत मुलीची चाचणीदेखील अंनिसने रोखली होती.

- या प्रथेचा आग्रह धरणारे पंच व प्रतिनिधी उघडपणे त्याचे समर्थन करत नाहीत. उलट विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर सामाजाच्या बदनामीचे आरोप करतात. आपल्यावर अशी सक्ती होत असल्यास तरुण तरुणींनी समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन अंनिसने केले आहे.

Web Title: Probable virginity test for the bride after the wedding ceremony in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.